नर उंदराच्या पेशीपासून बनवली चक्क अंडी! | पुढारी

नर उंदराच्या पेशीपासून बनवली चक्क अंडी!

टोकियो : एका जपानी संशोधकाने अनोख्या प्रयोगात मोठे यश मिळवले आहे. ओसाका युनिव्हर्सिटीतील प्रा. कात्सुहिको हायाशी यांनी नर उंदराच्या पेशींचा वापर करून अंडी विकसित केली आहेत. ‘एक्सवाय’ या पुरुष गुणसूत्राचे ‘एक्सएक्स’ या स्त्री गुणसूत्रात रूपांतर करण्याच्या संशोधनातील हा सुरुवातीचा टप्पा आहे.

‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. ती लंडनमधील क्रिक इन्स्टिट्यूटमधील ह्युमन जीन-एडिटिंग समिटमध्ये सांगण्यात आली. प्रा. हयाशी हे जीन-एडिटिंगच्या क्षेत्रातील जगप्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आता केलेल्या या संशोधनाचा भविष्यात काय परिणाम होईल याचीही सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यांनी सांगितले की या प्रयोगातून निर्माण झालेली अंडी किंवा स्त्रीबीज ही कमी गुणवत्तेची असून भविष्यात असे मानवाबाबतचे प्रयोग सुरक्षित ठरणार नाहीत. मात्र, स्त्री-पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्या दूर करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग नवी दिशा देऊ शकतील.

संशोधकांनी या प्रयोगात एका नर उंदराच्या त्वचेतून पेशी घेतल्या आणि त्यांचे रूपांतर स्टेम सेल म्हणजेच मूळपेशीत केले. या मूळपेशींचे कोणत्या अवयवाच्या पेशीत रूपांतर करता येऊ शकते. नर उंदराच्या पेशी असल्याने त्यांच्यामधील गुणसूत्रे ही ‘एक्स-वाय’ अशी होती. कात्सुहिको यांच्या टीमने पेशीतील ‘वाय’ गुणसूत्र काढून टाकले व एका ‘एक्स’ गुणसूत्राची डुप्लिकेट तयार केली. ही डुप्लिकेट मूळ ‘एक्स’ गुणसूत्राला जोडून कृत्रिमरीत्या ‘एक्सएक्स’ हे स्त्री गुणसूत्र विकसित केले. त्यानंतर या पेशीला स्त्रीबीज विकसित करण्यासाठी प्रेरित केले.

Back to top button