भारतीय मुलगा करीत आहे युक्रेनी मुलांना मदत | पुढारी

भारतीय मुलगा करीत आहे युक्रेनी मुलांना मदत

कीव्ह : रशिया आणि युक्रेन युद्धाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे; पण अद्याप हे युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. या युद्धाची सर्वाधिक झळ लहान मुलं आणि वृद्धांना लागली आहे. अशा काळात दहा वर्षांचा एक भारतीय मुलगा युक्रेनी मुलांना मदत करीत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे विस्थापित झालेल्या युक्रेनी मुलांसाठी ब्रिटनमध्ये राहणार्‍या या भारतीय मुलाने निधी गोळा केला होता. त्यामधून त्याने पुस्तके व अन्य स्टेशनरी साहित्य खरेदी केले होते. आता ते या मुलांना वाटण्यासाठी तो आपल्या आई-वडिलांसमवेत पोलंडला गेला आहे.

उत्तर इंग्लंडच्या ग्रेटर मँचेस्टरमधील मिलन पॉल कुमार नावाचा हा मुलगा पोलंडच्या क्राको शहरात गेला आहे. मिलन आणि त्याच्या कुटुंबीयांनी ‘युनिसेफ’च्या सहयोगाने आयोजित ‘मीटिंग पॉईंट इंटिग्रेशन सेंटर’चा दौरा केला. या केंद्राचे संचालन जुस्ट्रिक्ज फाऊंडेशन आणि अन्य संस्थांतर्फे केले जात आहे. याबाबत मिलनने ट्विट केले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मला इथे भरपूर मित्र मिळाले, ज्यांना मी पुन्हा एकदा अवश्य भेटणार आहे. त्याने रंगीत पेन्सिल, मार्कर आणि पेंटिंग्जही या मुलांना दिली. सेंटरच्या जवळ असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयालाही त्याने अनेक भेटी दिल्या, जेणेकरून पोलंड आणि युक्रेनमधील मुलं त्याचा वापर करू शकतील.

मिलन कुमारने या भेटींसाठी निधी जमवण्याच्या हेतूने लोकांच्या गाड्याही धुतल्या होत्या. तसेच गेल्या वर्षी ‘युक्रेन स्कूल्स अपील’साठी आपला पॉकेटमनीही दिला होता. त्याच्या या प्रयत्नांबद्दल त्याला ‘प्रिन्सेस डायना अ‍ॅवॉर्ड 2022’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तो लंडनच्या ‘सोशल अँड ह्युमॅनिटेरियन अ‍ॅक्शन’चा ‘आयविल अ‍ॅम्बॅसिडर’ही आहे. त्याने कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात ‘कोव्हिड ख्रिसमस परेड’ नावाच्या स्व-प्रकाशित पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक कार्यांसाठी निधी उभा केला होता. त्याबद्दल त्याला ब्रिटिश पंतप्रधानांचा ‘पॉईंट ऑफ लाईट अ‍ॅवॉर्ड’ही देण्यात आला होता.

Back to top button