पाण्याची टाकी नव्हे, स्वप्नातील बंगला | पुढारी

पाण्याची टाकी नव्हे, स्वप्नातील बंगला

केंब्रिज : जगात विविध प्रकारची घरे आढळतात. त्यातील काही घरांची किंमत ऐकताच काळजात धस्स होते. कारण, ही घरे खास या प्रवर्गात मोडणारी असतात. मात्र, काही मंडळी स्वतःच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन अशी आगळीवेगळी घरे साकारतात की नकळत त्याची बातमी होऊन जाते. काही जण झाडावर, तर काही जण कंटेनरलाच घरासारखा आकार देतात. आता असाच एक प्रकार ब्रिटनमधून समोर आला आहे.

या अवलियाचे नाव आहे रॉबर्ट हंट. त्याने चक्क पाण्याच्या टाकीलाच घरासारखे रंगरूप दिले आहे. यातील खरी गंमत तर पुढेच आहे. हंट याने 40 लाख रुपये मोजून भलीमोठी पाण्याची टाकी खरेदी केली. गेल्या 23 वर्षांपासून ही टाकी त्या ठिकाणी पडून होती. शिवाय तो जिथे नोकरी करत होता तेथून हे ठिकाण सुमारे 32 किलोमीटवर होते. मग त्याला एक भन्नाट आयडिया सुचली. त्याने या टाकीचे रूपांतर छानशा बंगल्यामध्ये करण्याचा ध्यास घेतला.

या कल्पनेने तो एवढा झपाटला होता की, त्यापायी त्याने आपली नोकरीसुद्धा सोडली. अहोरात्र त्याने या टाकीवर मेहनत घ्यायला सुरुवात केली. हे करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाण्याच्या टाकीतच घर बांधल्यानंतर त्याला पाणी आणि विजेचे कनेक्शन घेताना नाकीनऊ आले. मात्र, प्रशासनानेही त्याच्या जिद्दीला सलाम करून नियमांच्या जंजाळातून मार्ग काढला व त्याला याकामी मदत केली.

सांगण्याचा मुद्दा असा की, या घरावर त्याने तब्बल सहा कोटी रुपये खर्च केले आहेत. तेदेखील कोणाचीही मदत न घेता. इतरांपेक्षा आपले घर वेगळे असले पाहिजे, असे मी आधीपासूनच ठरवले होते. अखेर माझी स्वप्नपूर्ती झाली, असे तो सांगतो. सध्या त्याचे हे अनोखे घर ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.

Back to top button