दुबई मध्ये सर्वात खोल स्विमिंग पूल; पाण्याखाली चक्क रेस्टॉरंट, दुकाने! | पुढारी

दुबई मध्ये सर्वात खोल स्विमिंग पूल; पाण्याखाली चक्क रेस्टॉरंट, दुकाने!

दुबई ः ‘नवलाईची नगरी’ बनलेल्या दुबईत आता जगातील सर्वात खोल स्विमिंग पूलही तयार करण्यात आला आहे. हा स्विमिंग पूल तब्बल 60.2 मीटर खोल आहे. याबाबत त्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्येही करण्यात आली आहे. ‘डीप डाईव्ह दुबई’ नावाच्या या स्विमिंग पूलमध्ये पाण्याखाली चक्क अपार्टमेंट, रेस्टॉरंट आणि दुकानेही आहेत!

या स्विमिंग पूलमध्ये 1 कोटी, 40 लाख लिटर पाणी भरले जाऊ शकते. ऑलिम्पिक साईजच्या सहा स्विमिंग पूलमध्ये जितके पाणी असते तितके हे प्रमाण आहे. स्विमिंग पूलमधील पाण्याला सहा तासांनी फिल्टर केले जाते. त्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने विकसित केलेल्या फिल्टर टेक्नॉलॉजी आणि अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशनची मदत घेतली जाते. 1500 चौरस मीटर जागेतील या स्विमिंग पूलचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असते. स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह शॉप आणि गिफ्ट शॉप आहे. एक अपार्टमेंट आणि गॅरेजही पाण्याखाली आहे. तिथे स्कूबा डायव्हर्ससाठी अनेक प्रकारच्या कोर्सेसची सुविधा आहे. तसेच मिटिंग्ज, इव्हेंटस् तसेच कॉन्फरन्ससाठीही तिथे जागा आहे. याशिवाय 6 आणि 21 मीटर खोलीवर दोन कोरड्या खोल्या आहेत जिथे पाणी येत नाही. या स्विमिंग पूलचे सर्व लोकांसाठीचे बुकिंग जुलैअखेर खुले केले जाणार आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशी अल मखदूम यांनी जगभरातील पर्यटकांना या स्विमिंग पूलला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button