मतांच्या टक्कावाढीसाठी ‘सहकार’ रिंगणात; पुणे, शिरूर, मावळ लोकसभा मतदानासाठी समन्वयाने काम करणार | पुढारी

मतांच्या टक्कावाढीसाठी ‘सहकार’ रिंगणात; पुणे, शिरूर, मावळ लोकसभा मतदानासाठी समन्वयाने काम करणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील पुणे, शिरूर व मावळ लोकसभेसाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यादृष्टीने शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) संजय राऊत यांनी दिली. गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठ्या पोहचविण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांसोबत समन्वयाने काम करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शहर उपनिबंधक व सहाय्यक निबंधकांना त्यांनी 3 मे रोजी पत्राद्वारे विस्तृत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण अधिक असून, तेथील मतदारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रथमच 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गृहनिर्माण संस्थांमधील मतदानवाढीसाठी लेखापरीक्षकांची मदत घेण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना मतदान चिठ्ठी पोहचविण्यास मदत करावी, मतदानाच्या तारखेचा उल्लेख असलेली निवडणूक विषयक भित्तिपत्रके संस्थेच्या दर्शनी भागात लावावीत, सभासदांना मतदार यादीत नाव शोधून देणे, पात्र मतदारांची यादी तयार करून मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान केलेल्या मतदारांची नोंद घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.

वृद्ध, दिव्यांगांसाठी वाहनव्यवस्था करा

मतदान केंद्रापर्यंत वृद्ध व दिव्यांग सभासदांसाठी ने-आण करण्यासाठी शक्य असल्यास वाहनाची व्यवस्था करण्यात यावी. दुपारपर्यंत मतदान न केलेल्या सभासदांच्या भेटी घेऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे, यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्‍यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही विभागाच्या अधिकारी- कर्मचार्‍यांना देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button