Glass Frog : झोपताना ‘ग्लास फ्रॉग’ होतात ‘अदृश्य’! | पुढारी

Glass Frog : झोपताना ‘ग्लास फ्रॉग’ होतात ‘अदृश्य’!

लंडन : निसर्गाने अनेक जीवांना अनेक प्रकारच्या अनोख्या देणग्या दिलेल्या आहेत. सरडा, ऑक्टोपससारखे जीव आपला रंग बदलून बेमालूमपणे आजुबाजूच्या वातावरणात मिसळून जात असतात. काही जीवांचे शरीर तर पारदर्शकही असते. अशा जीवांमध्ये ‘ग्लास फ्रॉग’ (Glass Frog) प्रजातीच्या बेडकांचा समावेश होतो. या बेडकांचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हे बेडूक झाडाच्या पानावर झोपत असताना आपल्या शरीरातील सर्व तांबड्या रक्तपेशी एकाच अवयवात गोळा करून ठेवतात व जणू काही ‘अद़ृश्य’च होतात! पानावर हा बेडूक झोपलेला आहे हे चटकन ओळखून येत नाही.

‘सायन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या नव्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नॉर्दर्न ग्लासफ्रॉगला (Glass Frog) ‘हियालिनोबॅट्राचियम फ्लिशमॅन’ असे नाव आहे. या बेडकांमध्ये स्वतःला लपवण्याची अनोखी क्षमता असते. ते आपल्या शरीरातील सुमारे 90 टक्के तांबड्या रक्तपेशी हटवून त्या यकृतात गोळा करू शकतात. अशा पद्धतीने हा जमिनीवर राहणारा पारदर्शक प्राणी आपले रक्तही लपवून ठेवतो आणि निवांत झोपतो.

नॉर्थ कॅरोलिनामधील ड्यूक युनिव्हर्सिटीतील संशोधक सोंके जॉन्सन यांनी सांगितले की जर तुम्हाला खर्‍या अर्थाने पारदर्शक व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या तांबड्या रक्तपेशीही लपवाव्या लागतील. हा बेडूक हेच करतो आणि त्याच्यामध्ये त्यासाठीची अफलातून क्षमताही आहे. हे बेडूक (Glass Frog) कशा पद्धतीने ही क्रिया करतात हे समजलेले नाही. मात्र, ते रक्ताला फिल्टर करून त्यामधील तांबड्या रक्तपेशी बाजूला करतात आणि या पेशी यकृतात घट्टपणे साठवून ठेवतात. मात्र, तरीही या पेशींची गुठळी बनत नाही हे विशेष! अशी गुठळी का बनत नाही या उलगडा जर झाला तर त्याचा लाभ मानवातील आजारांवरील उपचारात होऊ शकतो. हे बेडूक एक इंचापेक्षा थोडे अधिक लांबीचे असतात. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलांमध्ये ते झाडांच्या पानांवर असतात.

हेही वाचा : 

Back to top button