हिरे असलेल्या, अतिउष्ण ग्रहाचा शोध | पुढारी

हिरे असलेल्या, अतिउष्ण ग्रहाचा शोध

वॉशिंग्टन :  अंतराळाच्या अनंत पसार्‍यात अनेक प्रकारचे ग्रह आहेत. आता खगोलशास्त्रज्ञांनी एका अशा ग्रहाचा शोध लावला आहे ज्याला ‘हेल प्लॅनेट’ असेच संबोधले जात आहे. नरकाच्या अग्नीची उपमा द्यावी असा हा अनोखा ग्रह आहे. तेथील ढग लाव्हारसाचा पाऊस पाडतात आणि समुद्र म्हणजे तप्त लाव्हाच आहे. मात्र, त्याच्या कोअरमध्ये म्हणजेच गाभ्यात हिरे आहेत. हा ग्रह पूर्वी असा नव्हता; पण तो त्याच्या तार्‍याच्या अधिक जवळ गेल्यानंतर त्याची अशी स्थिती झाली आहे.

या ग्रहाचे वर्गीकरण ‘55 कँक्री ई’ असे करण्यात आले असून त्याला ‘जानस्सेन’ असे टोपण नाव देण्यात आले आहे. डच स्पेक्टॅकल-मेकर असलेल्या झाचेरीयास जानस्सेन यांच्यावरून हे नाव दिले आहे. त्यांनीच पहिल्या ऑप्टिकल टेलिस्कोपचा शोध लावला होता. त्यांचे नाव दिलेला हा ग्रह पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. तो त्याच्या ‘कोपरनिकस’ असे नाव दिलेल्या तार्‍याभोवती पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या 70 पटीने कमी अंतरावरून प्रदक्षिणा घालतो. त्याच्यावरील एक वर्ष हे केवळ 18 तासांचे असते. याचा अर्थ त्याला आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केवळ 18 तास लागतात. ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्याचा तारा हा एका लाल खुजा तार्‍याबरोबरचा द्वितारा आहे. या ग्रहाला त्याच्या तार्‍याच्या विषुववृत्ताजवळ गुरुत्वाकर्षण शक्तीने खेचण्यात आले होते. आपल्या तार्‍याच्या इतक्या जवळ आल्याने त्याच्यावरील उष्णता वाढली आहे.

Back to top button