खूश राहायचे आहे? मग ‘हे’ करून पहाचं! | पुढारी

खूश राहायचे आहे? मग ‘हे’ करून पहाचं!

‘सुखी माणसाचा सदरा’ कुणाला मिळाला आहे का? खरे तर असे काहीच नसते, आनंदी राहणे हे बर्‍याच अंशी आपल्याच हातात असते. मुळातच आनंदी वृत्ती असेल तर माणूस कोणत्याही स्थितीत आनंदी राहू शकतो. मात्र, ताणतणावाच्या वेळी, दैनंदिन धावपळीच्या स्थितीत आनंदी राहण्यासाठी काही उपाय करणेही लाभदायक ठरते. अशाच काही वैज्ञानिक उपायांची ही माहिती…

धीमा, खोल श्वास घ्या

अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसनच्या माहितीनुसार धीमा आणि खोल श्वास तणावाला घटवतो. त्यासाठी आधी डोळे बंद करा. एखाद्या चांगल्या ठिकाणाची किंवा आठवणीची कल्पना करा. सावकाशपणे खोल श्वास घ्या आणि हळूहळू नाकाने किंवा तोंडाने बाहेर सोडा. असे अनेक वेळा करीत राहा. जर धीमा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेताना किंवा सोडताना मनात पाचपर्यंत आकडे मोजा.

दहा मिनिटांचा व्यायाम

दहा मिनिटांचा व्यायामही आपल्याला तणाव आणि एंग्झायटीपासून सुटका मिळवून देऊ शकतो. यामुळे आत्मविश्वासही वाढतो. रोज रात्री जेवल्यानंतर शतपावली जरूर करावी. दिवसाची सुरुवात पाच मिनिटांच्या स्ट्रेचिंगने करावी. कोणताही आवडता छंद जोपासावा. नृत्य, क्रिकेट किंवा बॅडमिंटन खेळणे, पेंटिंग अशा आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवावे.

चवीने जेवा

खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स उत्सर्जित करण्यास चालना देतात. त्यामुळे मूडही चांगला होतो. धान्य आणि फळे-भाज्यांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस् असतात. ते ‘फीलगुड’ हार्मोन सेरोटोनिन उत्सर्जित करतात. उच्च प्रथिनेयुक्त जेवण नोरेपीनेफ्राईन उत्सर्जित करते ज्यामुळे ऊर्जा आणि एकाग्रतेची क्षमता वाढते.

Back to top button