तब्बल 140 वर्षांनी दिसला ‘हा’ पक्षी | पुढारी

तब्बल 140 वर्षांनी दिसला ‘हा’ पक्षी

लंडन : 140 वर्षांमध्ये प्रथमच लुप्त समजल्या जाणार्‍या दुर्मीळ प्रजातीमधील पक्ष्याचे दर्शन घडले आहे. या पक्ष्याचे नाव आहे ‘ब्लॅक-नॅपेड पिजंट-पिजन’. कबुतरासारखा देह आणि भारद्वाज पक्ष्यासारखा रंग असलेल्या या पक्ष्याचे ‘ओटिडीफाप्स इन्शुलॅरीस’ असे शास्त्रीय नाव आहे. पापुआ न्यू गिनीच्या फर्ग्युसन बेटावर या पक्ष्यांचा मूळ अधिवास आहे. आता 1882 नंतर म्हणजे तब्बल 140 वर्षांनंतर हा पक्षी कॅमेर्‍यात टिपला गेला असून त्याला पाहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या शतकापेक्षाही अधिक काळात ही प्रजाती कदाचित लुप्त झाल्याचे मानले जात होते. मात्र, 2019 मध्ये पापुआ न्यू गिनी आणि अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या पाहणीवेळी स्थानिक लोकांकडून एका दुर्मीळ पक्ष्याचे वर्णन ऐकले. त्याला ते ‘ऑवो’ असे म्हणत होते. त्यानंतर या पक्ष्याचे कुतुहल वाढले आणि अखेर यावर्षी त्याला पाहण्यात यश आले. कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथोलॉजीचे संशोधक जॉर्डन बोरस्मा यांनी सांगितले की 1882 पासून हा पक्षी पाहण्यात आलेला नव्हता व तो आता आढळल्याने आनंद झाला. आम्ही माऊंट किलकेरनवर कॅमेरा ट्रॅप बसवलेले होते. हा या बेटावरील सर्वात उंच पर्वत आहे. तेथील कॅमेर्‍यामध्ये हा अत्यंत दुर्मीळ पक्षी टिपला गेला. एखादा खरा, जिवंत पिजंट-पिजन असा फुटेजमध्ये आढळल्याने ही प्रजाती अद्याप अस्तित्वात आहे याचे समाधान झाले.

Back to top button