‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचाही डिप्रेशनशी संबंध | पुढारी

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचाही डिप्रेशनशी संबंध

न्यूयॉर्क : शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच हाडे मजबूत ठेवण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे हे यापूर्वीच माहीत झाले होते. मात्र, या जीवनसत्त्वाची कमतरता डिप्रेशन म्हणजेच नैराश्यासारख्या मानसिक समस्येचेही कारण बनू शकते याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता याबाबतचे अधिक पुरावे दिसून आले आहेत. रक्तातील ‘ड’ जीवनसत्त्वाचा कमी स्तर आणि डिप्रेशनचा संबंध असल्याचे आढळले आहे.

सध्याच्या काळात अनेक लोक औदासिन्य, नैराश्याचे बळी ठरत आहेत. कोरोना काळात तर डिप्रेशनच्या रुग्णांमध्ये मोठीच भर पडली आहे. एकट्या अमेरिकेचाच विचार केला तर तेथील सुमारे 8.4 टक्के प्रौढ नागरिकांना 2020 मध्ये तीव्र स्वरूपाच्या नैराश्याचा सामना करावा लागला होता. त्याची माहिती ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ’मध्ये देण्यात आली होती. डिप्रेशनमुळे जीवनातील सर्वच गोष्टींवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामध्ये दैनंदिन जीवनातील कामापासून ते सामाजिक संबंधांपर्यंत आणि अगदी झोपेवरही त्याचा विपरित परिणाम होतो. अर्थात योग्य औषधे व उपचारामुळे माणूस यामधून बाहेरही पडू शकतो.

आता ‘ड’ जीवनसत्त्वाची यामधील भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाला ‘सनशाईन व्हिटॅमिन’ असेही म्हटले जाते. ज्यावेळी सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे त्वचेवर पडतात त्यावेळी ही किरणे शरीरात ‘ड’जीवनसत्त्वाच्या निर्मितीला चालना देतात. कोवळ्या उन्हात मानवी शरीरात नैसर्गिकरीत्याच ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होत असते. यकृत त्याचे रूपांतर ‘कॅल्सिडिऑल’मध्ये करते. त्यानंतर ते किडनीमध्ये कॅल्सिट्रिऑलमध्ये रूपांतरीत होते. ‘ड’ जीवनसत्त्व शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस शोषून घेऊन हाडे, दात व ऊतींना बळकटी देते.

रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठीही ‘ड’ जीवनसत्त्व उपयुक्त असते. ‘ड’ जीवनसत्त्वाचा स्तर कमी असेल तर माणूस विविध रोगजंतूंच्या संसर्गाला लवकर बळी पडू शकतो. ‘ड’ जीवनसत्त्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असते. आता या जीवनसत्त्वाचा डिप्रेशनशीही संबंध असल्याचे दिसून आले आहे. 30 हजार लोकांचा डाटा तपासल्यावर आढळून आले की ज्या लोकांना डिप्रेशनचा त्रास झाला त्यांच्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाचा स्तर कमी आहे. मात्र, ‘ड’ जीवनसत्त्व व डिप्रेशनचा संबंध अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. हे जीवनसत्त्व आहारातूनही घेता येते. मशरूम, अंडी, मासे, हिरवे वाटाणे, दूध यामधून हे जीवनसत्त्व मिळते.

Back to top button