कोरोनाबाधित रुग्णाला नेण्यासाठी पोहोचली क्रेन अन्.. | पुढारी

कोरोनाबाधित रुग्णाला नेण्यासाठी पोहोचली क्रेन अन्..

बीजिंग : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रकोप दिसून येत आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाला चक्क क्रेनने हलवण्यात येत असलेले हृदयद्रावक चित्र दिसत आहे.

हा व्हिडीओ चीनमधील असला तरी तो नेमका कुठला आहे, हे समजू शकले नाही. चिनी लेखक फेंग झोऊनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, कोरोनाबाधित रूग्णाला क्रेनच्या मदतीने आयसोलेशन वॉर्डला नेण्यात आले. जेणेकरून कोणतीही दुसरी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात येऊ नये. तसेच रुग्णांच्या शरीरातील एकही बॅक्टेरिया जमिनीवर पडू नये. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पीपीई किट परिधान केलेले असले तरी एकही अधिकारी रुग्णाजवळ न जाता त्याला क्रेनमधून हलवले.

असाच एक दुसरा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केला होता. यामध्ये चीनमधील आयसोलेशन सेंटरची भयावह स्थिती दाखविण्यात आली होती. यामध्ये जेलमधील बॅरेकसारख्या खोल्या दिसत होत्या. पांढर्‍या रंगाच्या या बॉक्सला लहान खिडकी होती. या खिडकीतून पीपीई किट परिधान केलेला व्यक्ती आतील रुग्णांना जेवण आणि औषधे देत होती. चीनमध्ये सध्या सार्वजनिक ठिकाणी कोरोना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे.

Back to top button