कलाकृतींचा बे ‘रंग’! शिल्पांचे सौंदर्य हरपले; देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

कलाकृतींचा बे ‘रंग’! शिल्पांचे सौंदर्य हरपले; देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सुवर्णा चव्हाण

पुणे : औंधमधील डी. पी. रस्ता आणि आयटीआय रस्त्याचे स्मार्ट सिटीअंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले खरे; पण या रस्त्यांलगत उभारलेल्या कलाकृतींची दुरवस्था झाली आहे. या दोन्ही रस्त्यांलगत साकारण्यात आलेल्या कलाकृती धुळीने माखल्या असून, येथे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि कचराही साचला आहे. तसेच, काही कलाकृतींचे रंगही उडाले आहेत. कलाकृतींच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एवढा पैसा खर्च करून उभारलेल्या कलाकृती आणि त्यांची अवस्था सुधारण्याकडे लक्ष
देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

औंधमध्ये काही वर्षांपूर्वी डी. पी. रस्ता आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत (आयटीआय रस्ता) असलेला रस्ता येथे स्मार्ट सिटीअंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले आणि दोन्ही रस्त्यांवरील पदपथावर विविध प्रकारच्या उत्कृष्ट कलाकृती उभारण्यात आल्या. पण, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या कलाकृतींची दुरवस्था झाली असून, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांचे जरी सुशोभीकरण झाले असले तरी कलाकृतींची अवस्था नीट नाही. काही लोकांनी येथे कचरा फेकला आहे तर काही कलाकृतींची अवस्था बिकट झाली आहे. डी. पी. रस्त्यावर भरारी, अग्नीपंख, मातृत्व आणि गावगाडा अशा विविध संकल्पनेवर येथे कलाकृती साकारण्यात आल्या असून, या सर्वच कलाकृतींची अवस्था नीट नाही. त्यांचे रंग उडाले आहेत.

अशीच काहीशी अवस्था आयटीआय रस्त्यावरील कलाकृतींचीही आहे. त्यामुळे प्रशासनाने कलाकृतींच्या देखभालीकडे लक्ष द्यावे. या कलाकृतींचे सौंदर्य पुन्हा प्राप्त व्हावे, यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याविषयी स्थानिक नागरिक चेतन चव्हाण म्हणाले, दोन्ही रस्त्यांवर खूप सुंदर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. पण, आता कलाकृतींची अवस्था खूप वाईट आहे. इतका पैसा खर्च करून कलाकृती साकारण्यात आल्या असतील तर त्यांची देखभाल करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कलाकृतींच्या देखभालीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.

हेही वाचा

Back to top button