उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये पाचपटीने वाढ; प्रवाशांची सोय; रेल्वेच्या उत्पन्नातही भर | पुढारी

उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये पाचपटीने वाढ; प्रवाशांची सोय; रेल्वेच्या उत्पन्नातही भर

प्रसाद जगताप

पुणे : यंदाच्या उन्हाळी सुट्यांमध्ये सर्वाधिक नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रेल्वेच्या पुणे विभागातून पाचपट अधिक उन्हाळी विशेष गाड्या धावल्या. परिणामी, प्रवाशांची मोठी सोय झाली असून, रेल्वेच्या उत्पन्नात आणि प्रवासीसंख्येत चांगलीच वाढ झाल्याचे समोर आले आहे. उन्हाळी सुट्या लागल्या की, अनेक नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी किंवा पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. यंदा उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत बाहेरगावी जाणार्‍या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा रेल्वेस्थानकांवरील वाढलेल्या गर्दीच्या नियोजनासाठी एसीमध्ये बसलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देखील स्थानकांवर येऊन प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करावे लागले. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना उन्हाळी सुट्यांंच्या कालावधीत दरवर्षी प्रवासासाठी होणारा त्रास यंदा काही प्रमाणात कमी झाला आणि यंदा प्रवाशांसाठी सर्वाधिक रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या.

या भागात धावल्या उन्हाळी गाड्या

प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने पुण्यातून बिहार राज्यातील दानापूरसाठी, उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूरसाठी, ओडिशातील संबळपूरसाठी, हडपसर टर्मिनलवरून गुवाहाटीसाठी, नाागपूरसाठी उन्हाळी विशेष गाड्या, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशीसाठी, यासोबतच राजस्थानातील जयपूर, अजमेर आणि भोपाळ मुझफ्फरपूरसाठी एकूण 63 विशेष गाड्या यंदा पुण्यातून धावल्या.

अशी झाली पाचपट वाढ

रेल्वे अधिकार्‍यांनी यंदा आरपीएफसोबत स्थानकांवर उतरून गर्दी नियोजनाचे काम केले. त्यामुळे रेल्वे अधिकार्‍यांना प्रवाशांना प्रवासासाठी होणारा त्रास आणि गाड्या वाढविण्यासंदर्भातील नियोजन समजले अन् रेल्वे अधिकार्‍यांनी पुणे विभागातून यंदा एप्रिल 2024 या एकाच महिन्यात 63 उन्हाळी विशेष गाड्या (जोड्या) सोडल्या. याउलट गेल्या वर्षी एप्रिल 2023 या महिन्यात फक्त दहाच विशेष गाड्या सोडल्या होत्या. यावरूनच रेल्वेच्या पुणे विभागात यंदा वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीसाठी सर्वाधिक पाचपट जास्त विशेष गाड्या सोडण्यात आल्याची नोंद रेल्वे प्रशासनाने केली आहे. परिणामी, रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये यंदा वाढ झाल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यात आम्ही पाचपट अधिक म्हणजे 63 गाड्या (जोड्या) सोडल्या. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात फक्त 10 उन्हाळी विशेष गाड्या पुणे विभागातून सोडण्यात आल्या होत्या.

– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

विशेष गाड्या, प्रवासी व उत्त्पन्न

  • पुण्यातून उन्हाळी विशेष गाड्या धावल्या – 63 जोड्या (सन 2024)
  • पुण्यातून उन्हाळी विशेष गाड्या धावल्या – 10 जोड्या (सन 2023)
  • आरक्षित प्रवासी – 70 हजार 567 (सन 2024)
  • उत्पन्न – 7 कोटी 70 लाख रुपये (सन 2024)
  • अनारक्षित प्रवासी – 18 हजार 70 (सन 2024)
  • अनारक्षित उत्पन्न – 70 लाख 25 हजार रुपये (सन 2024)

हेही वाचा

 

Back to top button