‘जेम्स वेब’ने टिपले गूढ तार्‍याचे छायाचित्र | पुढारी

‘जेम्स वेब’ने टिपले गूढ तार्‍याचे छायाचित्र

सिडनी : ‘नासा’च्या जेम्स वेब टेलिस्कोपने यावर्षीच्या जुलैमध्ये एका दूरस्थ तारा प्रणालीचे छायाचित्र पाठवले आहे. हे छायाचित्र पाहून खगोलशास्त्रज्ञही बुचकळ्यात पडले आहेत. अवास्तविक वाटणार्‍या भूमितीय आकाराने घेरलेले हे छायाचित्र नेमके कशाचे आहे हे त्यांनाही समजलेले नव्हते. अर्थात हे नंतर स्पष्ट झाले की हा एक धुळीने भरलेला व प्रचंड विकिरण क्षेत्र असलेला तारा आहे. हे छायाचित्र एखाद्या ‘कॉस्मिक थंबप्रिंट’सारखे दिसते.

जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने अल्पकाळातच अनेक प्रकारची अवकाशीय छायाचित्रे पाठवलेली आहेत. त्यापैकी हे छायाचित्र अनोखेच आहे. सिडनी विद्यापीठातील संशोधकांची टीम वीस वर्षांपासून या वेगळ्या वाटणार्‍या तार्‍याचे अध्ययन करीत आहे. त्याला ‘डब्ल्यूआर 140’ असे नाव देण्यात आले आहे. ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’मध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘डब्ल्यूआर 140’ हा ‘वूल्फ रेएट’ तारा म्हणूनही ओळखला जातो. हा एक दुर्लभ, पण सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण असा तारा आहे. तो कधी कधी धुळीच्या ढिगार्‍याला अंतराळात उत्सर्जित करतो जो आपल्या सौरमंडळाच्या आकाराच्या शेकडो पटीने मोठा आहे.

वूल्फ-रेएटस्च्या चारही बाजूंचे विकिरण क्षेत्र इतके तीव्र आहे की धूळ आणि हवा हजारो किलोमीटर प्रतिसेकंद किंवा प्रकाशाच्या गतीच्या सुमारे एक टक्का गतीने बाहेरील बाजूस वाहून नेते. सर्व तार्‍यांमध्ये तारकीय वारे असतातच; पण या तार्‍यामधील वारे किंवा वादळ हे वेगळेच आहे. अशा वार्‍यांमध्येच कार्बनसारखे घटक असतात जे बाहेर पडल्यावर धुळीत रूपांतरीत होतात. ‘डब्ल्यूआर 140’ हा बायनरी सिस्टीम म्हणजेच जुळ्या तार्‍यांच्या प्रणालीत आढळणार्‍या काही धुळीच्या ‘वूल्फ-रेएट’ तार्‍यांपैकी एक आहे.

Back to top button