‘टी-रेक्स’ हे वानरांइतके नव्हे, तर मगरींइतकेच बुद्धिमान! | पुढारी

‘टी-रेक्स’ हे वानरांइतके नव्हे, तर मगरींइतकेच बुद्धिमान!

वॉशिंग्टन ः ‘डायनासोर’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर हटकून अक्राळविक्राळ जबड्याचे शिकारी डायनासोर उभे राहतात. विशेषतः ‘जुरासिक पार्क’सारखे चित्रपट पाहिल्यावर तर हेच चित्र आपल्या मनात ठसलेले असते. हे डायनासोर म्हणजे ‘टी-रेक्स’ किंवा ‘टायरॅनोसॉरस रेक्स’ प्रजातीचे डायनासोर. त्यांच्या बुद्धिमत्ते विषयीही बरेच संशोधन करण्यात आले आहे. आता संशोधकांनी म्हटले आहे, की त्यांची बुद्धिमत्ता ही चिम्पांझी, ओरांगऊटानसारख्या एप वानरांइतकी नव्हे, तर सध्याच्या काळातील मगरींइतकीच होती!

1970 च्या दशकापासूनच अनेक संशोधकांनी म्हटले होते की टी-रेक्स हे आधुनिक काळातील सरीसृपांइतके ‘स्मार्ट’ होते. मात्र, 2023 मध्ये एका ब—ाझिलियन न्युरोसायंटिस्टने दावा केला की त्यांची बुद्धिमत्ता ही प्रायमेट्स म्हणजेच एप वानरांइतकी होती. एप वर्गात चिम्पांझी, ओरांगऊटान, गोरिला, बबून आणि माणसापर्यंत अनेकांचा समावेश होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर ‘एप’ म्हणजे ‘बिनशेपटी’ची वानरे! ही बुद्धिमान असतात, हे स्पष्टच आहे.

त्यांच्याइतकी बुद्धिमत्ता टी-रेक्स डायनासोरकडे होती म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या! आता एका नव्या संशोधनात आढळले आहे, की या दाव्यात काहीही तथ्य नाही. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘द अ‍ॅनाटोमिकल रेकॉर्ड’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की टी-रेक्सची बुद्धिमत्ता ही केवळ आधुनिक काळातील मगरींइतकीच होती. जर्मनीतील हीनरीच हीन युनिव्हर्सिटी ड्युसेलडॉर्फमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

हेही वाचा

Back to top button