पहिली सोलर इलेक्ट्रिक कार लाँच | पुढारी

पहिली सोलर इलेक्ट्रिक कार लाँच

दुबई : नेदरलँडमधील एका कंपनीने जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारचं नाव ‘लाईटइअर 0’ असं आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर तब्बल 700 किलोमीटरपर्यंत धावते. ही कार सध्या संयुक्त अरब अमिरातीत सादर करण्यात आली आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर या कारची किंमत 2,50,000 यूरो म्हणजेच तब्बल 2 कोटी रुपये इतकी ठेवली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील खरेदीदार ही कार कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बूक करू शकतात. हे वाहन 2023 च्या सुरुवातीला बाजारात दाखल होईल.

‘लाईटईयर 0’ ही कार उन्हाळ्यात अनेक महिने चार्जिंगशिवाय वापरता येईल. या कारचा टॉप स्पीड ताशी 160 किलोमीटर इतका आहे. ही कार 10 सेकंदात ताशी 0 ते 100 कि.मी. इतका वेग धारण करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये 60 किलोवॅट क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 174 एच.पी. पॉवर निर्माण करू शकते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 625 कि.मी.पर्यंतची रेंज देते. तसेच सौरऊर्जेद्वारे ही कार अतिरिक्त 70 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. म्हणजेच ही कार एकदा चार्ज करून बाहेर पडल्यानंतर तब्बल 695 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. मुंबई ते हैदराबाद हे अंतर 710 किलोमीटर इतकं आहे. म्हणजेच तुम्ही एकदा चार्ज केल्यावर ही कार घेऊन नवी मुंबईवरून हैदराबादला जाऊ शकता. या कारमध्ये 5 चौरस मीटर डबल कर्व्ड सोलार सिस्टीम देण्यात आली आहे.

Back to top button