‘त्या’ धडकेने लघुग्रहाची कक्षा बदलण्यात ‘नासा’ला यश | पुढारी

‘त्या’ धडकेने लघुग्रहाची कक्षा बदलण्यात ‘नासा’ला यश

वॉशिंग्टन ः पृथ्वीच्या दिशेने अनेक अवकाशीय शिळा म्हणजेच लघुग्रह येत असतात. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोरचे साम—ाज्य नष्ट झाले होते. अनेक लघुग्रह पृथ्वीजवळून जात असतात. अशा लघुग्रहांचा एक पट्टाच मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे. भविष्यात एखादा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याचा धोका निर्माण झाला तर पृथ्वीचे कसे संरक्षण करता येईल याचा विचार ‘नासा’मधील संशोधक करीत होते. त्यामधूनच ‘डार्ट’ मोहीम आखण्यात आली. यामध्ये एका लघुग्रहाभोवती फिरत असलेल्या छोट्या लघुग्रहाला ‘नासा’चे यान धडकवण्यात आले होते. आता या मोहिमेचे निष्कर्ष समोर आले आहेत. या धडकेने संबंधित लघुग्रहाची कक्षा बदलण्यात यश आल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘सेव्ह द वर्ल्ड’ असेच या मोहिमेला संबोधले जात होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. ‘नासा’ने म्हटले आहे की ‘डार्ट’ या यानाने डिमोरफोस या लघुग्रहाला यावेळी धडक देऊन त्यावर एक मोठा खड्डा निर्माण केला व त्यामधील धूळ अंतराळात विखुरली गेली. धूमकेतूच्या शेपटीसारखी हजार मैल लांबीची ही धूळ व दगडांची रेषा निर्माण झाली. या धडकेच्या परिणामावर अनेक दिवस दुर्बिणीच्या सहाय्याने नजर ठेवण्यात आली.

त्यामधून 520 फूट लांबीच्या या लघुग्रहाच्या मार्गात किती बदल झाला हे पाहण्यात आले. यानाची धडक होण्यापूर्वी हा लघुग्रह त्याच्या मूळ लघुग्रहाभोवतीची एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 11 तास 55 मिनिटांचा वेळ घेत असे. यामध्ये दहा मिनिटांची घट झाली असावी असे वैज्ञानिकांना वाटत होते; पण ‘नासा’चे प्रशासक बिल नेल्सन यांनी म्हटले आहे की ही घट 32 मिनिटांची झाली आहे. एखाद्या वेंडिंग मशिनच्या आकाराचे हे यान गेल्या वर्षी पाठवण्यात आले होते. ते सुमारे 1.10 कोटी किलोमीटर अंतरावरील ताशी 22,500 किलोमीटर वेगाने फिरणार्‍या लघुग्रहावर आदळवण्यात आले.

संबंधित बातम्या
Back to top button