सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान लघुग्रहाचा शोध | पुढारी

सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान लघुग्रहाचा शोध

न्यूयॉर्क : सूर्यमालेतील सर्वात वेगवान लघुग्रहाचा खगोलशास्त्रज्ञांनी नुकताच शोध लावला आहे. हा लघुग्रह अन्य लघुग्रहांच्या तुलनेत सर्वात कमी वेळेत सूर्याभोवतीचा एक फेरा पूर्ण करतो. सूर्यमालेतील या लघुग्रहाला ‘2021 पीएच 27’ असे नाव देण्यात आले आहे.

‘2021 पीएच 27’ हा लघुग्रह 113 दिवसांत सूर्याभोवतीचा एक फेरा पूर्ण करतो. तर बुध हा ग्रह अवघ्या 88 दिवसांत सूर्याभोवतीचा फेरा पूर्ण करतो. बुधाच्या तुलनेत ‘2021 पीएच 27’ हा लघुग्रह अंडाकार कक्षेत सूर्याभोवती फिरत असतो. यामुळेच तो सूर्याच्या अगदी जवळ पोहोचतो.

हा लघुग्रह सूर्याभोवती फिरत असताना या सूर्याच्या इतका जवळ पोहोचतो की, त्यावेळी या दोहोंमधील अंतर केवळ 20 मिलियन किलोमीटर इतके असते. मात्र, ज्यावेळी बुध सूर्याच्या अगदी जवळ पोहोचतो, त्यावेळी या दोहोंमधील अंतर सुमारे 47 मिलियन किलोमीटर इतके असते. म्हणजेच ‘2021 पीएच 27’ हा लघुग्रह बुधाच्या तुलनेत सूर्याच्या अगदी जवळून जातो.

दरम्यान, संशोधकांच्या अंदाजानुसार ‘2021 पीएच 27’ हा लघुग्रह ज्यावेळी सूर्याच्या अगदी जवळ पोहोचतो, त्यावेळी त्याचे तापमान तब्बल 500 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. इतक्या तापमानात अगदी सहजपणे काचही वितळते. याशिवाय हा लघुग्रह ज्यावेळी सूर्याभोवती अंडाकार कक्षेत फिरत असतो, त्यावेळी दोनवेळा सूर्याच्या अगदी जवळून जातो.

यामुळे त्याची जनरल रिलेटिव्हिटी फार जास्त होते आणि यामुळे काही वेळा कक्षेतच डगमगत असतो. गेल्या 13 ऑगस्ट रोजी संशोधकांनी या लघुग्रहाचा शोध लावला. चिलीतील वेधशाळा व डीईसी मॅगेलन टेलिस्कोपच्या मदतीने या ग्रहाचा शोध लावणे शक्य झाले.

Back to top button