सर्वात वेगाने फिरणारा तारा | पुढारी

सर्वात वेगाने फिरणारा तारा

लंडन : झेक प्रजासत्ताकच्या कोलोन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी सर्वात वेगाने फिरणार्‍या तार्‍याचा शोध घेतला आहे. हा तारा विक्रमी वेगाने कृष्णविवराच्या चहुबाजूने प्रदक्षिणा घालतो. या तार्‍याचे नाव ‘एस 4716’ असे आहे. आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रभागी असलेल्या ‘सॅजिटेरियस-ए’ या कृष्णविवराभोवती तो प्रदक्षिणा घालतो. या तार्‍याचा वेग 8 हजार किलोमीटर प्रतिसेकंद इतका प्रचंड आहे.

‘एस 4716’ तारा कृष्णविवरापासून शंभर वेळा पृथ्वी ते सूर्यापर्यंत येण्या-जाण्याच्या प्रवासाइतक्या अंतरावर आहे. अर्थात वरकरणी आपल्याला हे अंतर जास्त वाटत असले तरी खगोलीय मानकांचा विचार करता हे अंतर अतिशय कमी आहे. ‘द अ‍ॅस्ट्रोफिजिकल’ जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रात कृष्णविवराजवळही तार्‍यांची घनदाट संख्या आहे. या क्लस्टरला ‘क्लस्टर-एस’ असे म्हटले जाते. याठिकाणी शंभरपेक्षाही अधिक तारे आहेत. त्यांचा आकार आणि प्रकाश वेगवेगळा आहे. या क्लस्टर म्हणजेच तारकापुंजातील तारे वेगवान आहेत.

डॉ. फ्लोरियन पिएस्कर यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन करण्यात आले. त्यांनी सांगितले की या चमकदार क्लस्टरमुळेच आपल्याला अनेकवेळा आकाशगंगेचे केंद्र पाहता येत नाही. सुमारे वीस वर्षांच्या संशोधनानंतर आता कृष्णविवराच्या चारही बाजूंनी वेगाने फिरणार्‍या या तार्‍याचा शोध लावण्यात आला आहे. हा तारा चार वर्षांमध्ये आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. एकूण पाच टेलिस्कोपच्या मदतीने हा तारा पाहण्यात आला.

Back to top button