पृथ्वीसारख्या दोन ग्रहांचा शोध | पुढारी

पृथ्वीसारख्या दोन ग्रहांचा शोध

वॉशिंग्टन : जीवसृष्टीचा शोध घेत असताना तीन गोष्टी सर्वात आधी पाहिल्या जात असतात. संबंधित ग्रह खडकाळ, कठीण पृष्ठभागाचा असावा व तो गुरूसारखा निव्वळ वायूचा गोळा नसावा, दुसरे म्हणजे या ग्रहाचे त्याच्या तार्‍यापासूनचे अंतर योग्य असावे जेणेकरून त्यावरील तापमान जीवसृष्टीस अनुकूल होईल व तिसरे म्हणजे पाणी. आता ‘नासा’ने पृथ्वीसारख्याच ठोस, कठीण पृष्ठभाग असलेल्या दोन ग्रहांचा शोध घेतला आहे. हे ग्रह एका खुजा लाल तार्‍याभोवती फिरत आहेत.

या तार्‍याचे नाव ‘एचडी 260655’ असे आहे. पृथ्वीशिवाय अन्यत्र जीवसृष्टीच्या शोधाच्या कार्यात हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे संशोधकांना वाटते. हे दोन्ही ग्रह पृथ्वीपासून 33 प्रकाशवर्षे अंतरावर आहेत. त्यापैकी एका ग्रहाचे नाव ‘एचडी 260655 बी’ असे असून दुसर्‍याचे नाव ‘एचडी 260655 सी’ असे आहे.

हे दोन्ही ग्रह आपल्या सौरमंडळाबाहेर सर्वात जवळचे असे ग्रह आहेत ज्यांचा पृष्ठभाग पृथ्वीसारखाच ठोस आहे. ‘नासा’च्या ‘प्लॅनेट हंटर’ असे म्हटल्या जाणार्‍या ट्रांजिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईटने या दोन्ही ग्रहांचा शोध घेतला आहे. त्यांचा आकारही पृथ्वीइतकाच आहे. तसेच वातावरणाच्या तपासणीसाठीही हे ग्रह योग्य आहेत. ‘नासा’ची नवी विशालकाय अंतराळ दुर्बीण ‘जेम्स वेब’ पुढील महिन्यात पृथ्वीवर पहिले छायाचित्र पाठवत असतानाच हे महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे. या दोन्ही ग्रहांच्या वातावरणाच्या अभ्यासावरून तिथे जीवसृष्टीची शक्यता आहे की नाही हे समजू शकेल. या दोन्ही ग्रहांचा तारा आपल्या सूर्यापेक्षा कमी उष्ण असला तरी ग्रहांवरील तापमान अनुक्रमे 435 व 284 अंश सेल्सिअस इतके उष्ण आहे. त्यामुळे या ग्रहाला जीवसृष्टीला अनुकूल किंवा पृष्ठभागावर पाणी असणारा ग्रह मानता येत नाही.

Back to top button