Nashik-Sinner : ‘हळदी’चा अंदाज खरा; आता म्हणाले, तुम्हाला ‘दिल्ली’ मोकळी ! | पुढारी

Nashik-Sinner : 'हळदी'चा अंदाज खरा; आता म्हणाले, तुम्हाला 'दिल्ली' मोकळी !

सिन्नर : संदीप भोर

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले त्यादरम्यान आमदार माणिकराव कोकाटे यांनी डुबेरकरांना अर्थात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची हळद लागू शकते, असा औपचारिक गप्पांमध्ये अंदाज व्यक्त केला होता. निवडणुका जाहीर झाल्या आणि अवघ्या काही दिवसांत उद्धव ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आमदार कोकाटे यांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. आता मतदानानंतर वाजे समर्थकांच्या औपचारिक भेटीत गप्पा मारताना त्यांनी पुन्हा एकदा ‘तुम्हाला दिल्लीची वाट मोकळी झाली’, असे म्हणत वाने यांच्या विजयाचे जणू भाकीतच केले. आमदार कोकाटे यांच्या या वक्तव्याची सध्या तालुकाभर खमंग चर्चा आहे.

गेली तीस-पस्तीस वर्षे राजकारणात मुरलेला नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ख्याती आहे. वैशिष्ट्यपूर्ण विकासकामे उभारण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे विविधांगी प्रकल्पांमधून दिसून येते. राजकारणातील वारे कोणत्या दिशेने वाहतात याची त्यांना चांगलीच जाण असते. प्रसंगी अशा वाऱ्याची दिशा फिरविण्यासाठी ते जोरही लावतात, असे आजवरच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये दिसून आलेले आहे.

सिन्नर डुबेरे pudhari.news
डुबेरे : लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वीच ग्रामस्थांसमवेत आमदार माणिकराव कोकाटे यांची रंगलेली गप्पांची मैफल.

लोकसभा निवडणुकांचे मतदान झाल्यानंतर आता कोण बाजी मारणार, या संदर्भाने चर्चांचे फड रंगू लागले आहेत. अनेकांनी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेमोडही चालवली आहे. एवढेच नव्हे, तर राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे तसेच अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्या जय-पराजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच मतदानाच्या दिवशी वाजे यांचे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद चोथवे यांच्यासह कार्यकर्त्यांची व आमदार कोकाटे यांची चालता- बोलता भेट झाली. त्यात कोकाटे यांनी ‘तुम्हाला दिल्लीची वाट मोकळी झाली’ असे म्हणत शुभेच्छा व्यक्त केल्या, यासंदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आमदार कोकाटे यांनी एकप्रकारे राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचे भाकीतच केले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीच्या अंदाजानंतरचे माणिकरावांचे हे भाकीत खरे ठरणार काय? या संदर्भाने तालुकावासीयांची उत्सुकता ताणली आहे.

निवडणुकीत भूमिकाही मवाळच !

लोकसभा निवडणुकीआधी काही दिवस राजाभाऊ वाजे यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे व आमदार कोकाटे शहरात दोन-तीन कार्यक्रमांना एकाच व्यासपीठावर विराजमान झालेले बघायला मिळाले. त्यांच्यात कुठलाही अबोला दिसला नाही. उलटपक्षी दोघेही गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आज जरी वैचारिक मतभेद असले तरी वाजे कोकाटे यांचे एकेकाळचे गुरू-शिष्याचे नाते. त्यामुळे ते एकत्र दिसल्याने तो कुतुहलाचा विषयदेखील ठरला. तत्पूर्वी खासदार पुलाजवळील विठ्ठल- रुख्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धारासंदभनि पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रकाशभाऊंनी आमदार कोकाटे यांनी सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे आवर्जून सांगितले होते. त्यावरून वाजे-कोकाटे यांचे मनोमिलन होणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्यात थेट मनोमिलन झालेले नसले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने आक्रमक असलेल्या माणिकरावांची भूमिका काहीशी ‘मवाळ’ दिसली, हे मात्र खरे.

आमचा खासदार, आमचा तुमचा

राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून वाजे आणि कोकाटे समर्थकांनी सोशल मीडियावर आमचा खासदार आणि तुमचा आमदार अशा आशयाचा ट्रेंड चालवला होता. त्यात काहीअंशी तथ्यही जाणवले. राजाभाऊ वाजे लोकसभेवर निवडून गेल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत आपसूकच माणिकरावांचाही मार्ग सुकर होईल, अशी चर्चा सुरू झाली. त्याला राजकीय जाणकारांकडून पुष्टीही मिळत गेल्याचे जाणवले.

हेही वाचा:

Back to top button