अंटार्क्टिकामधील हिमवृष्टीत आढळले मायक्रोप्लास्टिक | पुढारी

अंटार्क्टिकामधील हिमवृष्टीत आढळले मायक्रोप्लास्टिक

मेलबोर्न ः अंटार्क्टिकामध्ये झालेल्या ताज्या हिमवृष्टीत संशोधकांना मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. यामुळे तेथील बर्फ वितळण्याची क्रिया अधिक वेगाने होऊ शकते तसेच त्याचा हवामानावर परिणाम होऊ शकतो. ‘द क्रायोस्फिअर’ या शोधपत्रिकेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ‘मायक्रोप्लास्टिक’ हे हवा किंवा पाण्यात असलेले प्लास्टिकचे अत्यंत छोट्या आकाराचे तुकडे असतात. ते पर्यावरणाबरोबरच आरोग्यासाठीही घातक ठरतात. यापूर्वीच्या एका संशोधनातही आढळले होते की पर्यावरणावर या मायक्रोप्लास्टिकचा वाईट प्रभाव पडत आहे.

सजीवांचा विकास, प्रजनन आणि सामान्य जैविक कार्यांनाही ते मर्यादित करते. मानवी जीवनावरही या मायक्रोप्लास्टिकचा हानिकारक प्रभाव पडत असतो. न्यूझीलंडच्या कँटरबरी विद्यापीठातील अ‍ॅलेक्स एवेस यांनी 2019 मध्येही अंटार्क्टिकाच्या दूरस्थ भागातील बर्फाचे नमुने गोळा करून त्यामधील मायक्रोप्लास्टिकचा छडा लावला होता. त्यांनी आता अंटार्क्टिकाच्या रॉस क्षेत्रातील 19 ठिकाणांमधून बर्फाचे नमुने गोळा केले व या सर्व नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले.

Back to top button