‘असे’ आहेत चंद्रावरील खडकांचे नमुने! | पुढारी

‘असे’ आहेत चंद्रावरील खडकांचे नमुने!

बीजिंग : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या ‘चांगी’ मोहिमेत चंद्रावरून खडक व मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले. 45 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या मोहिमेत असे चंद्रावरील नमुने आणले गेले. ‘चांगी’ यानाने आपल्यासमवेत 3.8 पौंड माती आणि खडकांचे नमुने आणले होते. आता त्यांचे छायाचित्र चीनने प्रसिद्ध केले आहे.

या छायाचित्रांमध्ये चंद्रावरील माती व छोटे-मोठे दगडांचे तुकडे दिसून येतात. एका क्रिस्टल कंटेनरमध्ये हे नमुने ठेवून त्यांचे ‘नॅशनल म्युझियम ऑफ चायना’ येथे प्रदर्शन केले जाणार आहे. या कंटेनरला पारंपरिक चिनी भांडे ‘झुन’सारखे डिझाईन करण्यात आले आहे. यापूर्वी 1974 मध्ये तत्कालीन सोव्हिएत संघाच्या ‘लुनार 24’ या रोबोटिक मोहिमेत चंद्रावरून खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर आणले होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये चीनच्या हेनान प्रांतातील वेंचांग लाँच साईटवरून ‘चांगी’चे ‘लाँग मार्च-2’ रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपण करण्यात आले होते. चंद्रावरील ‘ओशनस प्रोसेलॅरम’ असे नाव दिलेल्या ठिकाणी ते उतरले होते. हे एक ज्वालामुखीचे ठिकाण असून यापूर्वी कोणतेही यान तिथे उतरले नव्हते. तेथील खडक-मातीच्या नमुन्यांच्या अभ्यासातून चंद्रावरील ज्वालामुखींबाबत नवी माहिती मिळू शकते.

 

Back to top button