‘या’ माणसाने लावला होता सीट बेल्ट चा शोध | पुढारी

‘या’ माणसाने लावला होता सीट बेल्ट चा शोध

लंडन : चारचाकी वाहनांच्या अपघातावेळी माणसाचा जीव वाचवणारी वस्तू म्हणजे सीट बेल्ट. दुचाकीवरून जात असताना हेल्मेट जसे उपयोगी पडते तसेच चारचाकी वाहनातून जात असताना अपघाताप्रसंगी सीट बेल्ट उपयोगी पडतो. आता तर आपण सीट बेल्टशिवाय वाहनांची कल्पनाही करू शकत नाही. या जीव वाचवणार्‍या सीट बेल्टचा शोध लावला नील्स बोहलीन या माणसाने. त्याने वाहनचालकांवर किती उपकार करून ठेवले आहेत याची आपण कल्पना करू शकतो!

‘वोल्वो’ या जगप्रसिद्ध कार कंपनीत नील्स हे इंजिनिअर म्हणून काम करीत होते. आपल्या गाड्यांमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत ते संशोधन करीत असताना त्यांनी हा ‘व्ही’ आकाराच्या तीन पॉईंटस् असणार्‍या कार बेल्टचा शोध लावला. त्या काळी गुन्‍नार एन्जेलू नावाचे गृहस्थ वोल्वोचे चेअरमन होते. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. कारचालक आणि प्रवासी अशा दोघांचीही सुरक्षा वाढवण्यासाठी कारमध्ये काहीतरी नवे दल करण्याची आवश्यकता आहे असे एन्जेलू यांना वाटत होते. त्यासाठीच त्यांनी नील्स यांना ‘वोल्वो’मध्ये पाचारण केले होते. नील्स वोल्वोमध्ये आल्यानंतर एन्जेलू यांनी त्यांच्या अक्षरशः पाठी लागून हे संशोधन करवून घेतले. त्यामुळे अशी सुरक्षा असलेली वोल्वो ही पहिलीच कंपनी ठरली. नील्स यांनी या बेल्टचा शोध लावला तरी या संशोधनाचे पेटंट त्यांनी आपल्या नावावर ठेवले नाही तर जगातील सर्व गाड्यांना या प्रकारचे सीट बेल्ट वापरता यावेत म्हणून हे संशोधन जगासमोर खुले केले! सन 1959 मध्ये लावण्यात आलेल्या या शोधामुळे आतापर्यंत अनेकांचे जीव वाचले आहेत.

 

Back to top button