

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
बेळगाव तालुक्यावर पुन्हा एकदा भूसंपादनाचे संकट कोसळले असून हैदराबाद-पणजी महामार्गासाठी आता तालुक्यातील पाच गावांच्या शेतकर्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या गावांतील एकूण 120 सर्व्हे क्रमाकांतून हा रस्ता जाणार असून 21 दिवसांच्या आत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शनिवारी भूसंपादनाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्याद्वारे शेतकर्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार असल्याचे कळवले आहे. काही वर्षांपासून हैदराबाद-पणजी रस्त्यासाठी प्रयत्न सुरू होते. आता या नव्या रस्त्यात बदल करण्यात आला आहे. नव्या रस्त्यात तारिहाळ, चंदनहोसूर येथील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बेळगाव-हुनगुंद-रायचूर (हैदराबाद-पणजी) नवा राष्ट्रीय महामार्ग तयार केला जात आहे. त्यातून बेळगाव-बागलकोट राज्यमार्गाला यरगट्टीपर्यंत वगळण्यात आले आहे. नवा रस्ता यरगट्टी येथून मुरगोड, इंचलमार्गे लक्कुंडी या सौंदत्ती आणि बैलहोंगल तालुक्यातील राज्य मार्गावरून सिद्धापूरमार्गे बेळगाव तालुक्यात प्रवेश करणार आहे.
सिद्धापूरमार्गे बेळगाव तालुक्यात नवा राष्ट्रीय महामार्ग तयार केला जाणार आहे. हा नवा मार्ग गणिकोप्प येथून सुरू होणार असून चंदनहोसूरमार्गे तारीहाळ येथून हलगा-बस्तवाड येथील राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. या परिसरातील शेतकर्यांना केंद्र सरकारकडून नोटीस बजावण्यात आली असून त्यांना 21 दिवसांत आपले आक्षेप दाखल करावे लागणार आहेत. मात्र या भूसंपादन प्रक्रियेमुळे तारीहाळ परिसरातील पिकाऊ जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे. बस्तवाड, तारीहाळ, चंदनहोसुर, खमकारट्टी, शगनमट्टी येथील नियोजित मार्गात येणार्या सर्व जमिनी खडकाळ दाखविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोणतेही पीक घेतले जात नसल्याचे उतार्यात नोंद आहे. पण, प्रत्यक्षात ही काळीभोर पिकाऊ जमीन आहे. या जमिनी खडकाळ दाखवून त्या संपादित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भूसंपादनाविरोधात आक्षेप नोंदवण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली आहे.
बस्तवाड येथील एकूण 23 सर्व्हे क्रमांक
चंदनहोसूर येथील एकूण 23 सर्व्हे क्रमांक
कमकारट्टी येथील एकूण 9 सर्व्हे क्रमांक
शगनमट्टी येथील एकूण 19 सर्व्हे क्रमांक
तारिहाळ येथील एकूण 46 सव्हे क्रमांक