मंगळावरील पाण्याचे अस्तित्व अनुमानापेक्षा अलीकडचे! | पुढारी

मंगळावरील पाण्याचे अस्तित्व अनुमानापेक्षा अलीकडचे!

वॉशिंग्टन : मंगळावरील पाणी सुमारे 3 अब्ज वर्षांपूर्वी नष्ट होऊन गेले असे सर्वसामान्यपणे मानले जाते. मात्र, ‘नासा’च्या ‘मार्स रिकनायसन्स ऑर्बिटर’ने दिलेल्या डाटाचा अभ्यास करणार्‍या दोन संशोधकांना मंगळभूमीवरील 2 अब्ज ते 2.5 अब्ज वर्षांपूर्वीच्या पाण्याचे पुरावे सापडले आहेत. याचा अर्थ तिथे अनुमानापेक्षा एक अब्ज वर्षे अधिक काळ पाणी वाहत होते!

‘एजीयू अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकेकाळी तिथे बर्फाळ, पण द्रवरूपातील पाणी वाहत होते व या पाण्याने मागे सोडलेल्या क्लोराईड मिठाचे अवशेष आता सापडलेले आहेत. ज्या भागातून हे पाणी वाहत होते तेथील रचनाही असे दाखवते की हे पाणी तुलनेने अलीकडच्या काळापर्यंत वाहत होते.

द्रवरूप पाण्याचे पुरावेच तेथील खनिजे व क्षारांनी दिलेले आहेत. याचा अर्थ मंगळावर जर वाहते पाणी होते तर तिथे किमान सूक्ष्म जीवांच्या रूपात का होईना जीवसृष्टीही असण्याची शक्यता आहे. सूक्ष्म जीवांची ही दुनिया तिथे किती काळ टिकून राहिली हा आता संशोधनाचा विषय आहे. पृथ्वीचा विचार करता जिथे पाण्याचे अस्तित्व आहे तिथे जीवसृष्टीचेही अस्तित्व आहे. संशोधकांनी मंगळाच्या दक्षिण गोलार्धातील चिकट मातीच्या डोंगराळ भागाचा अभ्यास केला आहे. या भागात मिठाचे पुरावेही सापडलेले आहेत.

Back to top button