डाएटिंग करताना घ्या काळजी! हे होऊ शकतात दुष्परिणाम | पुढारी

डाएटिंग करताना घ्या काळजी! हे होऊ शकतात दुष्परिणाम

नवी दिल्ली :  काही दिवसांपूर्वी लेक्सी रीड या 30 वर्षीय महिलेने 141 किलो वजन कमी केले. त्यानंतर लेक्सीची प्रकृती इतकी बिघडली की तिच्या अवयवांनी काम करणे बंद केले व तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्याची, डायलेसिस करण्याची वेळ आली. त्यामुळे डाएटिंग करीत असताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रकारेच करणे गरजेचे आहे. अन्यथा यामुळे लाभ होण्याऐवजी हानीच होण्याचा संभव अधिक असतो.

डाएटिंगमुळे होणारे काही दुष्परिणाम असे :

तंदुरुस्तीवर परिणाम :  काही अहवालांचा दावा आहे की डाएटिंगचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. कमी आहारामुळे स्नायूंची ताकद घटते, केस गळतात, डिहायड्रेशन होऊ शकते तसेच हृदय गती मंदावू शकते.

भोवळ येणे : अनेकांना डाएटिंग करीत असताना भूक लागते आणि डाएटिंगमुळे अन्नसेवन केले जात नाही. अशावेळी पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात तसेच भोवळ येण्यासारखे प्रकारही घडतात.

जीवनसत्त्वांची कमतरता : डाएटिंग करीत असताना काही काळ शरीरात जीवनसत्त्वे व खनिजांची कमतरता भासू शकते. त्याचे कारण असे आहे की लोक आहारादरम्यान कमी कॅलरीज घेतात. त्यामुळे आवश्यक पोषक घटक शरीराला मिळत नाहीत.

थकवा :  पूर्वी अधिक खाणार्‍या लोकांनी डाएटिंग सुरू केल्यावर शरीर पूर्वीसारखीच प्रतिक्रिया देत नाही. शरीर ऊर्जेची बचत करण्यास सुरुवात करते, जेणेकरून ही ऊर्जा भविष्यात वापरता येईल. अशा स्थितीत थकवा आणि सुस्ती येऊ शकते.

तणाव :  काही अहवालांचा दावा आहे की जोपर्यंत शरीराला पुरेसे अन्न मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला थकवा जाणवेल. त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. महिलांना डाएटिंगमुळे मासिक चक्रात अनियमितता येण्याची समस्या जाणवू शकते.

डाएटिंग करीत असताना घेण्याची काळजी :

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करीत असाल तर नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आहार व त्याचे वेळापत्रक ठरवा. कमी कॅलरीजच्या आहारावरच भर दिला तर शरीराची हानी होऊ शकते.आहारात पुरेशा प्रमाणात फळे, हिरव्या भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पुरेशी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटस् असतात.

तांदूळ, रोटी, ब्राऊन ब्रेड, ओटस् यासारख्या कॉम्प्लेक्स कार्बच्या स्रोतांचा आहारात समावेश असावा, कारण ते शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे दिवसभर शरीरात ताकद राहते. कमी कॅलरीजचे अन्न घेतल्यावर शरीराला विश्रांती देणेही आवश्यक ठरते. तसे झाले नाही तर दिवसभर थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरातील निर्जलीकरण होणार नाही. तसेच प्रोटिन, हेल्दी फॅट आणि कार्बयुक्त आहार आवश्यक आहे. नुसते कमी खाल्ल्याने नव्हे तर योग्य प्रमाणात चांगले खाल्ल्याने वजन घटते. त्यासाठी व्यायाम आणि शारीरिक हालचालींचीही जोड गरजेची आहे.

Back to top button