वाळूत 23 हजार रुद्राक्षांचे महादेव! | पुढारी

वाळूत 23 हजार रुद्राक्षांचे महादेव!

पुरी :  महाशिवरात्रीच्या महापर्वकाळानिमित्त ओडिशाच्या पुरी किनार्‍यावर प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनायक यांनी भगवान शिवशंकराची वाळूची प्रतिमा साकारली. यामध्ये तब्बल 23,436 रुद्राक्षांचाही वापर करण्यात आला. महादेवाची ही वालुकामूर्ती 9 फूट उंच आणि 18 फूट रुंदीची आहे. सध्या रशिया-युक्रेनच्या युद्धाने जागतिक शांतता धोक्यात आल्याने वैश्विक शांतीसाठीची प्रार्थना या प्रतिमेखाली लिहिण्यात आली.

पटनायक यांनी ही वाळूची मूर्ती साकारण्यासाठी सुमारे 12 टन वाळूचा वापर केला. ही मूर्ती बनवण्यासाठी सहा तासांचा वेळ लागला. पटनायक यांनी यावेळी प्रथमच वाळूच्या कलाकृतीत रुद्राक्षांचाही वापर केला. सुदर्शन पटनायक यांनी आजपर्यंत वाळूपासून अनेक सुंदर कलाकृती बनवलेल्या आहेत. परदेशांमध्येही अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पटनायक यांनी जगभरातील साठपेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय वालुका शिल्पकृती महोत्सव व स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी देशासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. अनेक सामाजिक संदेश घेऊन ते अशा कलाकृती बनवत असतात.

Back to top button