Breakup : सतत ब्रेकअप, एकाकीपणामुळेही कर्करोगाचा धोका, नवे संशोधन | पुढारी

Breakup : सतत ब्रेकअप, एकाकीपणामुळेही कर्करोगाचा धोका, नवे संशोधन

कोपेनहेगन ः ब्रेकअप हा नेहमीच स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव देणारा असतो. आता एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, तो केवळ आपल्या मानसिक आरोग्यासाठीच नव्हे तर शारीरिक आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतो. (Breakup)

डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, सतत ब्रेकअप झेललेल्या तसेच दीर्घकाळ एकाकी राहणार्‍या पुरुषांच्या रक्तामध्ये ‘इन्फ्लॅमेशन’ अधिक आढळते. त्यामुळे भविष्यात कर्करोग, हृदयविकार तसेच ‘टाईप-2’ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी एकाकीपणा, ब्रेकअप यांचा खराब आरोग्याशी काय संबंध येतो, याबाबतचा अभ्यास केला. वारंवार डेटिंग करणार्‍या आणि ब्रेकअपचा सामना करणार्‍या तसेच एकटेपणा सहन करणार्‍या लोकांची यासाठी पाहणी करण्यात आली. घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू अशा कारणांमुळेही एकाकीपणा वाढतो व त्याचा परिणाम तन-मनावर होतो.

Breakup : एकाकीपणा झेलणार्‍या पुरुषांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होत असते. नव्या संशोधनासाठी 48 ते 62 वर्षे वयोगटातील लोकांची पाहणी करण्यात आली. 1986 पासून 2011 पर्यंत आपण किती वर्षे एकटे राहिलो हे या लोकांनी पाहणीत सांगितले. ब—ेकअप किंवा एकाकीपणा झेलणार्‍या पुरुषांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले.

जे लोक एक वर्ष एकटे राहिले त्यांच्या तुलनेत ब्रेकअप झेलणार्‍या लोकांच्या रक्तात 17 टक्के अधिक इन्फ्लॅमेशन आढळून आले. जे लोक अनेक वर्षे एकटे राहिले, त्यांच्या रक्तात 12 टक्के अधिक इन्फ्लॅमेशन मार्कर आढळले. विशेष म्हणजे असे केवळ पुरुषांच्याच रक्तात दिसून आले आहे.

याचा अर्थ ब्रेकअपला पुरुष वेगळ्या प्रकारे हाताळतात, असे संशोधकांना वाटते. ते अधिक मद्यपान किंवा धूम्रपान करू लागतात. महिलांमध्ये डिप्रेशनसारखी लक्षणे असतात. अर्थात, पाहणीमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी असल्यानेही असे घडले असावे.

हे ही वाचा : 

 

Back to top button