टोमॅटो भाजी आहे की फळ? | पुढारी

टोमॅटो भाजी आहे की फळ?

नवी दिल्ली: काही काही प्रश्न वर्षानुवर्षे लोकांना बुचकळ्यात टाकत असतात. ‘कोंबडी आधी की अंडे?’ हा प्रश्न त्यापैकीच एक. असाच आणखी एक प्रश्न आहे ‘टोमॅटो हे फळ आहे की भाजी?’ आता संशोधकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

एकेकाळी विषारी मानल्या जाणार्‍या टोमॅटोचा समावेश आता जगभरातील लोकांच्या आहारात झाला आहे. टोमॅटोशिवाय आपल्याकडेही ‘ग्रेव्ही’ तयार होत नाही की कोशिंबीरही बनत नाही. टोमॅटो सॉससारखे पदार्थ तर रोजच्या आहाराचाच भाग असतात. त्यामुळे टोमॅटोबाबत काही गोष्टींचे कुतुहलही लोकांना वाटत असते. टोमॅटो हे फळ आहे की भाजी याबाबत अनेक संशोधने झालेली आहेत हे विशेष! बहुतेक संशोधकांनी टोमॅटो हे एक फळ असल्याचे म्हटलेले आहे. त्याला काही संशोधकांनी विरोधही केला.

टोमॅटोच्या गुणधर्मांवर नजर टाकली तर टोमॅटो हे एक फळच असल्याचे दिसून येते. त्याला आपण ‘फळभाजी’च्या वर्गात टाकत असतोच. मात्र, काहींना ते नेहमीसारखे फळ नसून ती भाजी असल्यासारखे वाटते. ‘एन्सायक्लोपिडिया बि—टानिका’च्या एका अहवालानुसार फुलांच्या बीजांडापासून जे विकसित होते ते फळ असते. त्यामध्ये अनेक बिया असतात व हे सर्व टोमॅटोला लागू होते. त्यामुळे टोमॅटो हे फळांच्या श्रेणीत येते. ऑक्सफर्ड डिक्शनरीनेही टोमॅटोचे वर्गीकरण फळांमध्येच केले आहे. शब्दकोशानुसार टोमॅटो हे एक मऊ, लाल फळ असून त्यामध्ये रस असतो. मात्र, ते भाजी म्हणूनही वापरता येऊ शकते. केम्बि—ज डिक्शनरीमध्ये टोमॅटोला ‘अनेक बिया असलेले लाल, गोलाकार फळ’ असे म्हटलेले आहे.

फळांमध्ये गोडपणा आणि फायबर असतात. टोमॅटोमध्ये हे सुद्धा दोन्ही गुणधर्म आहेत. आता टोमॅटोमध्ये भाज्यांचे कोणते गुण आहेत ते पाहू. विज्ञान असेही सांगते की फळे नेहमीच ‘मिष्टान्न’ म्हणून सादर केली जातात, भाज्यांच्या बाबतीत असे होत नाही. ‘मेन कोर्स’मध्ये भाज्यांचा समावेश होतो, या अर्थाने टोमॅटोचा भाजीत समावेश होतो. टोमॅटो हे नेहमीच सॅलड, कोशिंबीर किंवा भाजी म्हणून खाल्ले जाते व त्यामुळेच त्याला ‘भाजी’ म्हटले जाते. फळांप्रमाणे त्याला फारसा गोड रस नसतो किंवा इतर फळांसोबत ते खाणेही लोक पसंत करीत नाहीत. अर्थात काहीही झाले तरी टोमॅटोमधील विविध पोषक घटक पाहता ते खाणे आरोग्यासाठीही लाभदायक ठरते, इतके आपल्यासाठी पुरेसे आहे!

  • जय भीम चित्रपटातल्या गाण्याचं हे मराठी कव्हर सॉंग जरूर ऐका

Back to top button