Lok Sabha polls Voting first phase | प. बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचार, भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री, मणिपूरमध्ये गोळीबार | पुढारी

Lok Sabha polls Voting first phase | प. बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचार, भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री, मणिपूरमध्ये गोळीबार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज शनिवारी (दि. १९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघात मतदान सुरु आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल आणि मणिपूर वगळता देशातील इतर ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७ वाजता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी तीन जागांसाठी मतदान सुरू होताच तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कूचबिहार शहराजवळील चांदमारी येथे दोन प्रतिस्पर्धी गटात झालेल्या हिंसाचारात किमान एक जण जखमी झाला. यावेळी झालेल्या हिंसाचारात दगडफेकही झाली. (Lok Sabha polls Voting first phase)

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात सकाळी ११ पर्यंत ३३.५६ टक्के मतदानांची नोंद झाली होती.

मणिपूरमध्ये गोळीबार

दरम्यान, मणिपूरमधील मोइरांग विधानसभा क्षेत्रातील थामनपोकपी येथील मतदान केंद्राजवळ शुक्रवारी एका गटाने गोळीबार केला. मात्र, कसलीही जीवितहानी झाली नाही. या गोळीबारामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील मतदानासाठी रांगा लावलेल्या मतदारांमध्ये भीती निर्माण झाली. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराच्या आवाजाने लोक मतदान केंद्राबाहेर पळताना दिसत आहेत.

तृणमूलचा गट अध्यक्ष अनंत बर्मन हा भेटागुरी येथे क्रूड बॉम्ब हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा तृणमूलने केला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज्यमंत्री उदयन गुहा यांनी रुग्णालयात धाव घेतली.

तृणमूल आणि भाजप या दोन्हींनी एकमेकांवर मतदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे. मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखल्याचा आणि बूथ एजंटांवर हल्ला करण्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या राज्यपाल कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मतदान हिंसाचार आणि मतदारांना धमकावण्याशी संबंधित बहुतेक कॉल्स कूचबिहारमधून येत आहेत. निवडणुकीतील हिंसाचाराच्या तक्रारींसाठी भाजपने कोलकाता येथील कार्यालयात हेल्पलाइन सुरू केली आहे. तर तृणमूलच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी कोलकाता येथून मतदानावर लक्ष ठेवून होते.

कुचबिहारमधील २,०४३ पैकी १९६ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या भागात याआधीही निवडणुकीदरम्यान हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्या आहेत. १० एप्रिल २०२१ रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी येथे मतदारांसह ५ लोकांची हत्या करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या ३ लोकसभा मतदारसंघात ५६.२६ लाख मतदार आहेत. (Lok Sabha polls Voting first phase)

हे ही वाचा :

Back to top button