त्र्यंबकेश्वरमध्ये होणार कुस्त्यांची विराट दंगल; 2 लाख रुपयांसह चांदीची गदा बक्षीस | पुढारी

त्र्यंबकेश्वरमध्ये होणार कुस्त्यांची विराट दंगल; 2 लाख रुपयांसह चांदीची गदा बक्षीस

त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा ; त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवार, २६ जानेवारी २०२४ रोजी कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांना प्रतिक्षेत असलेली त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र दिनाला होणारी कुस्त्यांची दंगल मागच्या वर्षापासून प्रजासत्ताक दिनास होत आहे. त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पहिलवान शांताराम बागुल यांनी महाराष्ट्र दिनास १ मे २०१० रोजी कुस्त्यांची विराट दंगल भरवली. तेव्हापासून दरवर्षी येथे कुस्त्यांचा दंगल आयोजित करण्यात येत असतो. मागच्या वर्षापासून कुस्तीगीर, कुस्तीप्रेमी यांच्या आग्रहास्तव १ मे रोजी होणाऱ्या कुस्त्या प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीस सुरु झाल्या आहेत.

या कुस्ती दंगलीत दरवर्षी भाग घेण्यासाठी महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्यातील पहिलवान येत असतात. यापूर्वी नरसींग यादव, हर्षल सदगीर या महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेत्या पहिलवानांनी येथे मानाची चांदीची गदा जिंकली व त्यानंतर त्यांची वाटचाल महाराष्ट्र केसरीकडे होत राहिली.

यावर्षी २६ जानेवारीस होणाऱ्या कुस्त्यांसाठी पुणे येथील पहिलवान वेताळ शेळके आणि दिल्ली येथील पहिलवान सुखचेण गुलीया यांची प्रमुख लढत होणार आहे. इनामी कुस्त्यामध्ये १ हजार रुपयांपासून ते २ लाख व चांदीची गदा असे इनाम आहेत.

संस्थापक अध्यक्ष पहिलवान शांताराम बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती स्पर्धांचे अध्यक्ष दिपक लोखंडे, कार्याध्यक्ष राजाभाऊ घुले यांनी नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वर येथील अभिनव कॉलेज समोर दक्षिणमुखी हनुमान मंदिर जव्हार फाटा येथे दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ ते ६ वाजेच्या दरम्यान कुस्त्यांची विराट दंगल होत आहे.

हेही वाचा :

Back to top button