कांद्यावर मर, करप्याचा प्रादुर्भाव ; महिनाभरात 70 टक्के भाव उतरले | पुढारी

कांद्यावर मर, करप्याचा प्रादुर्भाव ; महिनाभरात 70 टक्के भाव उतरले

इंदोरी : परिसरातील सुदवडी, सदुबंरे, सांगुर्डी, येलवाडी पट्ट्यात कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत क्विंटलला पाच हजारांचा भाव मिळाला होता. मात्र, ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी सापडला संकटात
आता फक्त दीड हजार रुपये दराने कांदा विकला जात असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. यंदा चांगले उत्पादन व भाव मिळत असल्याने कर्जाच्या खाईतून बाहेर पडू, अशी शेतकर्‍यांना आशा होती. मात्र, कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी लागू केल्याने कांद्याचे भाव पडले आहेत.

असा बसला कांद्याला फटका
गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा पिकावर मर व करपा रोग पडल्याने पिकांची अन्नशोषण क्रियाच थांबून उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे आता खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती झाली आहे. कमी उत्पन्न व मातीमोल भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकाला मोठा फटका बसत आहे. शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी
केली आहे.

अनेक शेतकरी कर्जबाजारी
कांदापीक खर्चिक आहे. एकरी सुमारे 40 हजारांवर खर्च येतो. गेल्या दोन वर्षांपासून मातीमोल भावात कांदा विकला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांना मागील दोन वर्ष अतिवृष्टीमुळे पिके हाती आली नाहीत. त्यामध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. यंदा पाऊस झाला नाही. त्यामुळे अपुर्‍या पावसावरच शेतकर्‍यांनी खरीप हंगाम घेतला होता. मात्र, त्यातूनही पैसे मिळाले नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

Back to top button