नाशिक : सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार ! | पुढारी

नाशिक : सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार !

नाशिक : दीपिका वाघ
कोणत्याही व्यावसायिकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावाच लागतो. ग्राहक जेवढ्या प्रमाणात सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करतात तेवढा नफा व्यावसायिकांना अधिक असे गणित आहे. आताच्या घडीला जेवढे सोशल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याच्या दुप्पटीने मानसिक आजारपण वाढले आहेत. खास करून १० ते ३५ वयोगट गेल्या दहा वर्षांत प्रचंड स्क्रीन टाइमचा बळी ठरला आहे. त्यासाठी काही केस स्टडी बघू…

*२१ वर्षांचा मुलगा नामांकित कंपनीत कायमस्वरूपी नाेकरीला, पण ऑनलाइन लॉटरीमध्ये पैसा मिळत गेल्याने नोकरीपेक्षा जास्त लॉटरीवर विश्वास बसला आणि चांगली नोकरी सोडली. लाॅटरीपायी २५ लाख रुपयांची उधारी करून घेतली. हे त्यालाही लक्षात आले नाही. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने घरच्यांसाठी मोठा शॉक होता.

*३४ वर्षीय मुलगा त्याला अॅानलाइन शॉपिंगचे व्यसन जडले. रोज काही ना काही खरेदी करून ५० बुटांचे जोड त्याने जमा केले. ते बॉक्स कधी उघडून बघितले नाही. घरातली एक खोली पूर्ण सामानाने भरली होती. त्याच्या या सवयीमुळे घरचे हतबल झाले.

*एमबीबीएस शिकणारी विद्यार्थिनी व मलेशियात राहणारा मुलगा. दोघेही डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. प्रेमात आकंठ बुडालेले असताना सात महिन्यांनंतर मुलाने अचानक कोणतेही कारण न सांगता मुलीला ब्लॉक केले आणि विषय संपला. मुलीचा कोंडमारा होऊन ती डिप्रेशनमध्ये गेली.

*सतत वेबसिरिज मुव्हीज बघण्याचे व्यसन लागलेला १९ वर्षीय मुलगा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची स्पर्धा माणसाच्या झोपेची आहे. नॅशनल इंटरनॅशनल सिरिज बॅक टू बॅक बघण्याच्या सवयीमुळे त्याचे व्यसनात रूपांतर झाले.

मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या या रोजच्या केसेस झाल्या आहेत. डिस्टन्स रिलेशनशिप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब झालेल्या तरुणांसाठी अशी रिलेशनशिप आधार असते. त्यामुळे ते व्हर्च्युअल रिलेशनशिपवर अवलंबून असतात. ९९ टक्के डिस्टन्स रिलेशनशिप फसव्या असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे अचानक प्रेमभंग झाल्यावर नैराश्य येऊन आत्महत्या करायला मागेपुढे पाहत नाहीत. शॉपिंग, लॉटरी, रिलेशन्स, गेमिंग, ओटीटी, रिल्स यामधून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

यामधून बाहेर कसे पडता येते
एखाद्या गोष्टीचे व्यसन जडले आहे त्याची जाणीव सर्वात आधी रुग्णाला होणे गरजेचे असते. व्यसन जडण्याची ती पहिली पायरी असते. त्यानंतर रुग्णाचे, गरज पडल्यास कुटुंबाचे समुपदेशन, औषधपचार करून दैनंदिन आयुष्य जगता येते. पण, रुग्णाने व्यसन जडल्याचे मान्यच केले नाही. केवळ घरच्यांमुळे तो मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला तर सुधारण होणे अवघड असते. त्यामुळे पालक आणि मुलांनी एकमेकांकडे लक्ष देणे गरजेचे असते. आजाराचे निदान जेवढ्या लवकर तेवढे उपचार करणे सुलभ होते.

सोशल प्लॅटफॉर्म मनोरंजन, संवादाचे माध्यम आहे. त्याला दैनंदिन जीवनात मर्यादित प्रमाणात वापरले तरच योग्य आहे. त्यावर अति अवलंबून राहिल्यास दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. सोशल प्लॅटफॉर्मच्या अतिवापरामुळे जीवनाचे ध्येय, नातेसंबंध, सामाजिक वावर याकडे दुर्लक्ष होऊन नैराश्य त्यातून व्यसन जडण्याची शक्यता वाढते. त्यासाठी मनोरंजनासाठी इतर पर्याय शोधावेत. – डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ.

Back to top button