नाशिक ग्रामीण पोलिस दल भरतीच्या लेखी परीक्षेत 8 हरकती | पुढारी

नाशिक ग्रामीण पोलिस दल भरतीच्या लेखी परीक्षेत 8 हरकती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील 164 रिक्त शिपाई पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. 2) झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरम्यान या परीक्षेबाबत उमेदवारांच्या आठ हरकती आल्या आहेत.

त्यानुसार कार्यालयाने पडताळणी करून योग्य गुण जाहीर केले आहेत. या सर्व हरकती निकाली काढत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार 139 उच्चांक गुण उमेदवारांनी मिळवले आहेत. प्रवर्गनिहाय अंतिम यादी जाहीर झाल्यावर शिपाईपदासाठी निवड यादीची प्रक्रिया सुरू होईल. रविवारी झालेल्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा दावा एका उमेदवाराने केला होता. दुसर्‍या उमेदवाराने इतर उमेदवारांची मदत घेतल्याची हरकत उमेदवाराने नोंदवली होती. त्याची शहानिशा केली असता, दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांत परीक्षा देत होते. त्यामुळे कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचा दावा पोलिसांनी केला. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठ उमेदवारांनी निकालाबाबत हरकती नोंदवल्या आहेत. त्याची पडताळणी करून पोलिस अधीक्षक कार्यालयाने सर्व हरकतींवर स्पष्टीकरण देत त्या निकाली काढल्या आहेत.

139 उच्चांकी गुण
1 हजार 32 उमेदवारांची लेखी व मैदानी चाचणीतील 150 पैकी गुणांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये दोन उमेदवारांनी सर्वोच्च 139 गुण मिळवले आहेत. तर, 130 च्या पुढे अनेक उमेदवारांनी गुण मिळवले आहेत. लवकरच प्रवर्गनिहाय यादी जाहीर होणार असून अंतिम यादी तयार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button