बारामतीत बुलेटराजांना आवरण्याची गरज; फटफट आवाजाने नागरिक हैराण | पुढारी

बारामतीत बुलेटराजांना आवरण्याची गरज; फटफट आवाजाने नागरिक हैराण

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या ग्रामीण भागात बुलेटस्वारांचा आवाज वाढला आहे. फटफट असा आवाज करीत वेगाने जाणार्‍या बुलेट नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागल्या आहेत. याला आळा घालण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.
दुचाकी वाहनांमध्ये बदल करून, जास्त आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविले जातात. तसेच, कर्कश साउंड सिस्टिम बसवून मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे तसेच शहर परिसरात बुलेटस्वार सुसाट वेगात फेरफटका मारत आहेत.

विशेषत: बारामतीच्या पश्चिम भागात असे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेमुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडेच तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस ठाण्याबाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत असतात. परंतु अशा वाहनांवर स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिस तसेच उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कारवाई करीत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सोमेश्वरनगर, वडगाव, कोर्‍हाळे, माळेगाव, बारामती शहर आदी भागांत असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुले बुलेट चालवत आहेत आणि काही पालक यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

प्रशासकीय यंत्रणा हतबल
बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; तशीच ती आरटीओचीही आहे. मात्र, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर व गाड्यांवर कारवाई करण्यात आरटीओ हतबल ठरल्याचे चित्र आहे.

Back to top button