नाशिक : फसवणूक करणार्‍यांचे बँक खाते गोठविले | पुढारी

नाशिक : फसवणूक करणार्‍यांचे बँक खाते गोठविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या दोन संशयितांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयितांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंत झालेले असून, शेअर मार्केटमधील ज्ञानाच्या जोरावर त्यांनी चांगला नफा कमावल्याचे समोर येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 22 तक्रारदारांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संशयित अविनाश सूर्यवंशी आणि अमोल शेजवळ यांना अटक केली आहे. दोघेही पोलिस कोठडीत असून, त्यांना अटक झाल्यापासून 22 तक्रारदारांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारींनुसार फसवणुकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. संशयितांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना गुंतवणूकदारांना आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून खासगी कंपनीच्या नावे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले होते. त्यासाठी संशयितांनी जिल्हाभरात त्यांचे एजंटही नेमल्याचे समोर येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी चौकशी केल्यानंतर फसवणुकीचा आकडा 30 कोटींहून अधिक असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत संशयितांवर भद्रकाली व मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अनेक धनाढ्य व्यक्ती आमिषाला बळी
शेअर मार्केटच्या ज्ञानाच्या जोरावर संशयितांनी इतर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. 12 टक्के किंवा दुप्पट परतावा देण्याचे आमिष संशयितांनी दाखविले होते. त्यांच्या आमिषाला सॉफ्टवेअर डेव्हलपरसह अनेक धनाढ्य व्यक्ती बळी पडल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. संशयितांनी याआधी शेअर मार्केटमधून नफा कमावल्याने अधिक नफा कमावण्याच्या नादात त्यांनी इतर गुंतवणूकदारांचाही पैसा वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा डाव फसला आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा:

Back to top button