सासवड : सावरकरांबाबत चुकीचे शब्द सहन करणार नाही : विजय शिवतारे

सासवड : सावरकरांबाबत चुकीचे शब्द सहन करणार नाही : विजय शिवतारे

सासवड; पुढारी वृत्तसेवा : वीर सावरकरांनी वयाच्या 15 व्या वर्षी देशाच्या सेवेसाठी वाहून घ्यायची शपथ घेतली. सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बर्‍याच खस्ता खाल्या आहेत. भविष्यात त्यांच्याविषयी कोणी चुकीचे शब्द काढल्यास आम्ही सहन करणार नाही, असा इशारा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सासवड (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. 6) शिवसेना-भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिवतारे बोलत होते. या वेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव, भानूकाका जगताप, संतोष जगताप, जालिंदर जगताप, अ‍ॅड. शिवाजी कोलते, रमेश इंगळे, डॉ. राजेश दळवी, पंडित मोडक, अमोल जगताप, रवी फुले आदी उपस्थित होते.

शिवतीर्थ चौकातून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली. 'भारत माता की जय'ची घोषणाबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक भैरवनाथ मंदिर येथे गेली. तेथून जयप्रकाश चौकात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

दरम्यान हिंदू जनजागर परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र ठकार यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, काँग्रेसचे निलंबित खासदार स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बाष्कळ टीका करून नकारात्मक प्रसिद्धी मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत. यापुढे सावरकरांवर कोणतीही टीका हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटना सहन करणार नाहीत व याचे लोकशाही मार्गाने योग्य प्रत्युत्तर वेळच्या वेळी देण्यात येईल, असेही ठकार यांनी सांगितले. प्रास्ताविक जालिंदर कामठे यांनी केले. गंगाराम जगदाळे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news