मोहोळ तालुक्यात तीन ठिकाणी वीज कोसळली; शेतकरी ठार | पुढारी

मोहोळ तालुक्यात तीन ठिकाणी वीज कोसळली; शेतकरी ठार

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा

मोहोळ तालुक्यात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून जीवितहानी झाली. तांबोळे येथे वीज कोसळल्याने बाळू गोविंद सरवदे (वय 52) ठार झाले, तर भाऊ प्रकाश सरवदे (55, दोघेही रा. पिंपरी) हे किरकोळ जखमी झाले. पोखरापूर येथे वीज कोसळून दरवाजाचा खिळा डोक्यात घुसल्याने मारुती कडापा लेंगरे जखमी झाले. कोन्हेरी येथेही वीज कोसळल्याने म्हैस जागीच ठार झाली. पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

पिंपरी येथील शेतकरी बाळू सरवदे व त्यांचा मोठा भाऊ प्रकाश सरवदे हे दोघे दुपारी तांबोळे गावच्या हद्दीत शेतीची कामे करीत होते. दुपारी पावणेतीन वाजता विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी बाळू सरवदे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते होरपळून जागीच ठार झाले तर प्रकाश सरवदे किरकोळ जखमी झाले.

पोखरापूर येथील मारुती लेंगरे हे घराच्या दरवाज्यात थांबले होते. यावेळी त्यांच्यासमोरच अचानक वीज कोसळली. विजेचा धक्का बसून ते बाजूला पडले. यावेळी एक मोठा लोखंडी खिळा त्यांच्या डोक्यात खोलवर घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. घरातील सदस्यांनी
त्यांना उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, लोखंडी खिळा डोक्यात खोलवर रुतल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात पाठवून देण्यात आले.

कोन्हेरी येथेही सायंकाळी साडेचार वाजता जनार्दन माहिपती मुळे यांच्या शेतातील घरासमोरील जनावरांच्या गोठ्यावर वीज कोसळली. यामध्ये म्हैस जागीच ठार झाली. दरम्यान, तीनही घटनांची नोंद महसूल प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. सततच्या पावसाने शेतीचेही मोठे नुकान झाले.

Back to top button