भाजप घाटगे पाटलांच्या मागे उभा राहील : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

भाजप घाटगे पाटलांच्या मागे उभा राहील : चंद्रशेखर बावनकुळे

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : तुम्ही सतीश घाटगे पाटलांना ताकद द्या बाकी भाजप घाटगे पाटलांच्या मागे उभा राहील, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 च्या विधानसभेला घनसावंगी मतदार संघात भाजपचे सतीश घाटगे पाटील ताकदीने लढणार असल्याचे संकेत दिले. काल (शुक्रवार) रात्री वडीगोद्री येथील गुरुदेव सेवाश्रम मध्ये सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

घनसावंगी मतदार संघात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजप घनसावंगी मतदार संघाच्या वतीने समृद्धी कारखान्याचे चेअरमन भाजप नेते सतीश घाटगे, भाजपचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी सत्कार केला.

यावेळी शिक्षक मतदार संघांचे उमेदवार किरण पाटील, समृद्धी कारखान्याचे चेअरमन भाजपचे नेते सतीश घाटगे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भरत भादरंगे, भाजपचे घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे, भाजपचे विश्वजित खरात, अनिरुद्ध झिंजूर्डे आदी उपस्‍थित होते.

पुढे बोलतांना बावनकुळे म्हणाले की, लवकरच 10 हजार कार्यकत्‍यांचे घनसावंगी मतदार संघात मोठे संमेलन घेणार असून, या कार्यक्रमासाठी 6 तास वेळ देणार असून, या 6 तासात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून घनसावंगी मतदार संघातील समस्या सोडवण्याचे काम करणार आहे. घनसावंगी मतदार संघात भाजपचे संघटन मजबूत करून सतीश घाटगे पाटील यांना ताकद देण्याचे काम भाजप करेल यासाठी केंद्र सरकारच्या 49 योजना ज्या घनसावंगी मतदार संघात पोहोचल्या नाहीत त्या घाटगे पाटील यांच्या नेतृत्वातून जनतेपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यावेळी या कार्यक्रमास भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

नाव न घेता माजी मंत्री राजेश टोपेंना बावनकुळेचा इशारा

घनसावंगी विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून कोणीही प्रतीस्पर्धी नसल्याने एक हाती राज्य सुरु आहे. आता मी काल परवा वाचले एका ऑडिटरने ऑडिट मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार समोर आणला आहे. त्याचा रिपोर्टही मिळाला आहे. असा खोचक इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाव न घेता माजी मंत्री राजेश टोपे यांना दिला आहे.

हेही वाचा :  

Back to top button