सोलापूर : भाजप नगरसेवकाचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन | पुढारी

सोलापूर : भाजप नगरसेवकाचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : ऐन सणासुदीच्या काळातही महापालिका प्रशासनाने प्रभागात पाणी सोडले नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संतोष भोसले यांनी चक्क पोलिस मुख्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले. यावेळी पाण्याच्या टाकीवरून त्यांनी आयुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली.

प्रभाग 16 मध्ये शनिवारी पाणी येण्याचा दिवस असूनही सणासुदीच्या दिवशी महापालिकेने पाणी सोडले नाही. अधिकारी पाण्याचे राजकारण करीत आहेत. हिंदू सणाच्या वेळेस महापालिकेचे अधिकारी पाणीपुरवठा विस्कळीत करत आहेत. यापूर्वीही असाच प्रकार घडला आहे. याकडे महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष नाही.

हिंदू सणांच्या वेळेस पाणीपुरवठा विस्कळीत का केला जातो, असे म्हणत या प्रकाराला कंटाळून पाण्याच्या टाकीवरून उडी मारत असल्याचा इशारा नगरसेवक संतोष भोसले यांनी दिला. तसा मेसेजही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. भोसले शनिवारी सकाळी साडेअकरादरम्यान पोलिस आयुक्तालयासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढले.

यावेळी सोलापूर पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता विनायक चौबे हे पाण्याच्या टाकीवर पोहोचले. त्यांनी नगरसेवक भोसले यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु भोसले यांनी तुम्ही फक्त पगार घेता, काम मात्र मन लावून करीत नाहीत, तुम्हीच अगोदर राजीनामा द्या, असे म्हणत गोंधळ घातला.

यावेळी भोसलेंनी पाण्याच्या टाकीवर चढून चार तास पाणी देण्याऐवजी एकच तास पण जादा दाबाने पाणीपुरवठा करावा. आयुक्त पाण्याच्या नियोजनासाठी बैठक घेतात. नियोजन मात्र शून्य आहे. मग त्या बैठका कशाला घेता? आयुक्तांनी राजीनामा द्यावा. पाच दिवसाआड पाणी का, आयुक्तांनी खुर्ची खाली केली पाहिजे.

नियोजन होत नाही तर पगार कशासाठी घेता? असा संतप्त सवाल उपस्थित केला. शिवाय आक्रमक होत त्यांनी आयुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली. अखेर पोलिसांनी भोसलेंना पाण्याच्या टाकीवरून ताब्यात घेतले.

Back to top button