औरंगाबाद: अखेर विद्यापीठ प्रशासन नरमले; कार्यक्रमाच्या नव्याने छापल्या निमंत्रण पत्रिका | पुढारी

औरंगाबाद: अखेर विद्यापीठ प्रशासन नरमले; कार्यक्रमाच्या नव्याने छापल्या निमंत्रण पत्रिका

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावर सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून विरोधक तसेच स्थानिक आमदारांची नावे वगळल्यामुळे वादाची ठिणगी पडली. विद्यापीठ प्रशासनाच्या या प्रकारामुळे शुक्रवारी (दि.१६) विविध विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत कुलगुरूंना घेराव घालत जाब विचारला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने चूक मान्य करत नरमाईची भूमिका घेतली. व अनावरण सोहळ्याच्या २ तास अगोदर नव्याने निमंत्रण पत्रिका तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना पाठवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१६) शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांची नावे होती. विधान परिषद विरोधी पक्षनेते, खासदार यासह स्थानिक आमदारांना निमंत्रण पत्रिकेत वगळण्यात आले होते. हे वृत्त प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या.

भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. तुकाराम सराफ, एमआयएम विद्यार्थी आघाडीचे कुणाल खरात, शारेक नक्षबंदी, मझर पठाण यासह अन्य विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे दालन गाठले. त्यांना घेराव घालून या चुकांबद्दल धारेवर धरले. सर्वांचा आक्रमक पवित्रा पाहून कुलगुरूंनी चूक झाल्याचे मान्य करत विधान परिषद विरोधी पक्षनेते, खासदार यासह स्थानिक आमदारांची नावे टाकून नव्याने निमंत्रण पत्रिका तयार केली. आणि संबंधित लोकप्रतिनिधींना पाठवण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button