काँग्रेस नेते नसीम खान यांच्या मनधरणीचे प्रयत्न | पुढारी

काँग्रेस नेते नसीम खान यांच्या मनधरणीचे प्रयत्न

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले काँग्रेस नेते नसीम खान यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाच्या हायकमांडच्या सूचनेनंतर मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी सोमवारी खान यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी गायकवाड यांनी माजी खासदार प्रिया दत्त यांची भेट घेत चर्चा केली. तर, दुसरीकडे गायकवाडांच्या उमेदवारीने नाराज झालेल्या नसीम खान यांची खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, अमरजीत मनहास यांनी भेट घेतली. या भेटीवरून उलटसुलट चर्चा रंगल्या. मात्र, ही भेट नाराजी दूर करण्यासाठी होती. पक्षातील हायकंमाडने दिलेल्या सूचनेनुसार या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.

मुळात या मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाई जगताप, सुरेश शेट्टी यांची नावे चर्चेत होती. मात्र, आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकदिलाने काम करण्याच्या सूचना पक्षाने दिल्या आहेत. तसेच हायकमांडने खान यांची नाराजी दूर करण्यासाठी चर्चा करण्याच्या सूचना दिल्यानंतर मुंबईतील नेत्यांनी आज बैठक केली. विशेष म्हणजे स्वतः वर्षा गायकवाड यांनीही काही दिवसांपूर्वी नसीम खान यांची भेट घेत चर्चा केली होती.

दरम्यान, या भेटीसंदर्भात काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले की, नसीम खान हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. अल्पसंख्याकांचे एक
खंबीर नेतृत्त्व आहे. प्रचारात त्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याने त्यांची भेट घेतली. त्यांची नाराजी आम्ही हायकमांडला कळविली आहे.

संभाजी ब्रिगेडचा वर्षा गायकवाड यांना पाठिंबा

उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांना संभाजी ब्रिगेडने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील पदाधिकार्‍यांनी गायकवाड यांची भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर केला.

Back to top button