नगर : ‘सातबारा’वरील जातीवाचक नावे हद्दपार! | पुढारी

नगर : ‘सातबारा’वरील जातीवाचक नावे हद्दपार!

नगर : पुढारी वृत्तसेवा : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर व नेवासा तालुक्यातील रामडोह, गोपाळपूर, वरखेड, माळेवाडी दुमला, सुरेगाव दहिगाव, गळनिंब व खामगाव या गावांतील ग्रामपंचायतीने सातबारा उतार्‍यावरील शेतीचे स्थानिक नाव या रकान्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा ठराव घेतला. या ठरावास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली. त्यामुळे या आठ गावांतील सातबारा उतार्‍यांवरील जातीची नावे आता हद्दपार होणार आहेत.

समाजातील जाती-पातीच्या भिंती गळून, सामाजिक सलोखा व सौहार्दपूर्ण वातावरण टिकून राहावे, यासाठी शासनाच्या महसूल विभागाने 25 ऑगस्ट 2021 रोजी सातबारा उतार्‍यातील शेतीचे स्थानिक नाव या या रकान्यात नोंदविण्यात आलेल्या जातीवाचक नावाची नोंद कमी करून, सुधारित नोंद घेण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता. यात जातीच्या नावाऐवजी आवश्यक असल्यास गावातील स्थानिक-भौगोलिक स्थितीशी निगडित, नदी नाल्याची निगडित नावे देण्यात यावीत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या निर्णयाची जिल्ह्यातील प्रथम अंमलबजावणी राहाता व नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे.

राहाता तालुक्यात बाभळेश्वर ग्रामपंचायतीने सातबारा उतार्‍यावर जातीच्या नावाचा उल्लेख न करण्याचा ठराव केला. या ठरावानुसार बाभळेश्वर गावातील एका शेतकर्‍याच्या सातबारा उतार्‍यावरील शेतीचे स्थानिक नाव यामधील ‘महारांचा गट नंबर’ हा उल्लेख हद्दपार करत ‘बनसोडे यांचा गट नंबर’ असा जातीविरहित नावाचा उल्लेख असलेला सातबारा उतारा देण्यात आला आहे.

राज्य शासनाने यापूर्वी जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याचा पुरोगामी निर्णय घेतला होता. आता सातबारा उतार्‍यावरील जातीचे नाव हद्दपार करण्याच्या निर्णयाने गावागावांत सामाजिक वातावरण निकोप होण्यास मदत होणार आहे. यातून अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांच्या प्रमाणातही घट होण्यास मदत होणार आहे.
– कुंदन हिरे, तहसीलदार, राहाता

Back to top button