छ. संभाजीनगर: विरोधी पक्षनेत्यालाच दिली ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर | पुढारी

छ. संभाजीनगर: विरोधी पक्षनेत्यालाच दिली ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा ज्वर प्रचंड वाढला असून राज्यात तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. तेथेच दुसरीकडे राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांना ईव्हीएम मशीन हॅक करून देण्याची ऑफर देत एका भामट्याने तब्बल अडीच कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, दानवे यांच्या बंधूंनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी भामट्याला एक लाख रुपये घेताना पकडले. ही कारवाई शहरातील गोल्डन हॉटेलमध्ये आज (दि. ७) करण्यात आली.

मारोती ढाकणे (रा. काटेवाडी, जि. अहमदनगर), असे पकडलेल्या भामट्याचे नाव आहे.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखा निरीक्षक संभाजी पवार यांनी ही माहिती दिली आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनीही याबाबत माहिती दिली असून आरोपी हा कर्जबाजारी आहे. ते पैसे फेडण्यासाठी त्याने अशा थापा मारून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात त्याला कुठलेही तांत्रिक ज्ञान नाही. तो बीए शिकलेला आहे. संशयित मारोती ढाकणेविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button