Jammu and Kashmir | कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, TRF च्या टॉप कमांडरसह २ दहशतवादी ठार | पुढारी

Jammu and Kashmir | कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, TRF च्या टॉप कमांडरसह २ दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए तैयबाचा टॉप कमांडर बासित अहमद दार याच्यासह दोन दहशतवादी ठार झाले. कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पाइन भागात मंगळवारी सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु होती. कुलगाममध्ये मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकूण दोन दहशतवादी ठार झाले. त्यात लष्कर-ए तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंट (TRF) चा टॉप कमांडर बासित दार देखील चकमकीत मारला गेला.

कुलगाममध्ये चकमकीत ठार झालेला बासित दार हा “ए” कॅटेगरी दहशतवादी असून तो द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) शी संबंधित होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विधि कुमार बिरदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, सुरक्षा दलांना रेडवानी गावात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री या भागाची घेराबंदी करण्यात आली. तसेच शोधमोहीम सुरू करण्यात आली.

मात्र, शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरु झाली. जी मंगळवारपर्यंत सुरू होती. बासित दार हा सुरक्षा यंत्रणांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्येच्या १८ हून अधिक प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता, असे काश्मीर पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.

कुलगाम चकमकीबद्दल माहिती देताना IGP काश्मीर विधि कुमार बिरदी म्हणाले, “ही कारवाई रात्रभर सुरू राहिली आणि आज दुपारी संपली. या ऑपरेशनदरम्यान दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले आणि त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यापैकी एक TRF संघटनेशी संबंधित आहे. त्याचा १८ हून अधिक प्रकरणांमध्ये सहभाग होता. अल्पसंख्याक, पोलिस दल आणि नागरिकांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता.”

दरम्यान, शनिवारी आयएएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम तीव्र केली होती. या हल्ल्यात कॉर्पोरल रँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा :

Back to top button