औरंगाबाद : काॅंग्रेसला धक्का, रामू काका शेळके यांचा आज भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

औरंगाबाद : काॅंग्रेसला धक्का, रामू काका शेळके यांचा आज भाजपमध्ये प्रवेश

औरंगाबाद पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके यांचे पती तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू काका शेळके आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दि. ४ रोजी दुपारी तीन वाजता उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. रामूकाका हे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे काम करत होते. काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ता ते कुंबेफळ गावचे सरपंच, तर पुढे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होईपर्यंत रामू काका शेळके हे काँग्रेसची एकनिष्ठ होते.

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यानंतर फुलंब्री मतदारसंघात तथा औरंगाबाद तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यात रामू काका शेळके यांचा मोठा वाटा आहे. आगामी काळात विधानसभेचे उमेदवार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जात होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केल्याने रामू काका शेळके सारख्या बड्या नेत्याला भाजपमधून काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रामू काका शेळके यांच्या भाजप प्रवेशामुळे हरिभाऊ बागडे यांच्यानंतर फुलंब्री जागेसाठी आस लावून बसलेल्या अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button