

मुंबई ; वृत्तसंस्था : पाच वेळेचा आयपीएल चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सच्या दुर्दैवाचे दशावतार सुरूच असून शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर 24 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद 169 धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 18.5 षटकांत 145 धावांवर गारद झाला. कोलकातासाठी मिचेल स्टार्क्सने 4 विकेटस् घेऊन विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. जवळपास 12 वर्षांनी कोलकाताने वानखेडेवर मुंबईला पराभूत केले आहे. या विजयाने केेकेआरने प्ले ऑफच्या दिशेने कूच केली, तर मुंबईने स्पर्धेबाहेर होणार्या दरवाजाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.
होमग्राऊंड वानखेेडे स्टेडियमवर केकेआरचे 170 धावांचे आव्हान पार करताना मुंबईची अवस्था बिकट झाली. इशान किशनने सुरुवात आक्रमक खेळी केली; परंतु 7 चेंडूंत 13 धावा करून तो बाद झाला. नमन धीरही (11) लगेच तंबूत परतला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेला रोहित शर्मा तिसर्या विकेटच्या स्वरूपात बाद झाला. त्याने 11 धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये संघाच्या फलकावर 46 धावा लागल्या होत्या आणि त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.
पॉवर प्लेनंतरही मुंबईची गळती सुरू राहिली. एन. तिलक वर्मा (4), निहाल वढेरा (6) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. हार्दिक पंड्याचा फ्लॉप शो या सामन्यातही दिसला. तो फक्त एका धावेवर बाद झाला. त्यामुळे मुंबईची अवस्था 6 बाद 71 अशी झाली.
सूर्यकुमार मात्र विजयासाठी संघर्ष करीत होता. सूर्याने 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, पण त्यात 6 धावांची भर घालून तो बाद झाला. सूर्याने 35 चेंडूंत 56 धावा केल्या. यावेळी मुंबईच्या 15.3 षटकांत 7 बाद 120 धावा झाल्या होत्या.
उर्वरित 50 धावा करण्याची जबाबदारी डेव्हिडसह तळाच्या फलंदाजांवर होती. डेव्हिडने स्टार्कला षटकार ठोकून त्याची सुरुवात केली, पण याच षटकांत डेव्हिड (24) बाद झाला. स्टार्कने मग चावला आणि कोएत्झीला बाद करून मुंबईला 145 धावांत गुंडाळले. स्टार्कने 33 धावांत 4 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, कोलकाताच्या डावाची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर सामन्याच्या तिसर्या षटकात तुषाराने कोलकाता दोन धक्के दिले. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर त्याने दुसर्या चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीला बाद केले. अंगक्रिशने 13 धावा केल्या. त्यानंतर त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर त्याने श्रेयस अय्यरलाही झेलबाद करवले. अय्यर केवळ 6 धावा करू शकला. तुषारानंतर पाचव्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्याने सुनील नारायणचा 5 धावांवर त्रिफळा उडवला, तर पीयुष चावलाने डावाच्या सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिंकू सिंगला 9 धावांवर स्वयंझेल घेत बाद केले.
सुमार दर्जाच्या फलंदाजीमुळे कोलकाताचा अर्धा संघ 57 धावांतच बाद झाला होता, पण त्यानंतर व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक आणि मनीष पांडेची त्याला लाभलेली साथ यामुळे कोलकाता दीडशेपार मजल मारता आली. मनीष पांडेने 31 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावा केल्या. तो बाद झाल्यावर पुन्हा कोलकाताची फलंदाजी ढेपाळली. आंद्रे रसेल 7 धावांवर धावचीत झाला. त्यापाठोपाठ रमणदीप सिंग (2), मिचेल स्टार्क (0) हे दोघेही बाद झाले. व्यंकटेश अय्यर शेवटपर्यंत झुंज देत होता. 52 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. बुमराहने त्याला त्रिफळाचीत करत कोलकाताचा डाव 169 धावांवर संपवला. मुंबईकडून नुवान तुषारा, जसप्रीत बुमराहने 3-3 विकेट घेतल्या.