सोलापूर : मानवी वस्तीत आलेल्या घोणसाला सोडले निसर्गाच्या सानिध्यात | पुढारी

सोलापूर : मानवी वस्तीत आलेल्या घोणसाला सोडले निसर्गाच्या सानिध्यात

सोलापूर; जगन्नाथ हुक्केरी : जुना पुणे नाका येथील वसंत विहार परिसरात भर दुपारी विषारी घोणस साप नजरेस पडल्याने स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली. ही माहिती नेचर कॉन्झर्वेशनच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच  त्यांनी या विषारी सापाला ताब्यात घेत निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. सापाला पकडल्याने या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वसंत विहार परिसरातील स्पर्श हॉस्पिटलजवळ एका घराच्या कंपाऊंड लगत घोणस हा विषारी साप नजरेस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. याची माहिती नेचर कॉन्झर्वेशनच्या पदाधिकाऱ्यांना सोहेल गब्बुरे यांनी दिली. त्यानंतर तत्काळ नेचर कॉन्सर्वेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पालापाचोळा, गवत, तुटून पडलेल्या झाडाच्या फांदी यातून मार्ग काढत हा साप सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागला.
तेव्हा प्रसंगावधानता साधत नेचर कॉन्झर्वेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सापाला पकडले आणि प्लास्टिक डब्यामध्ये बंद करत त्या सापाला  निसर्गाच्या अधिवासात सोडून दिले.

आतापर्यंत नेचर कॉन्झर्वेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सापाप्रमाणेच पशु-पक्षी, प्राणी यांनासुद्धा धोकादायक प्रसंगातून वाचवत त्यांचे जीव वाचवले आहेत. तसेच या संस्थेमार्फत जिल्ह्यातील नागरिकांना पशु-पक्षी प्राणी याबाबत माहिती देऊन त्यांच्या विषयी आत्मीयता बाळगण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

चौकट
तब्बल एक फूट लांबी
वसंत विहार परिसरात ताब्यात घेतलेल्या सापाची लांबी साधारण एक फूट होती. याला प्लास्टिक भरणीच्या साहाय्याने सुखरूप रेस्क्यू करून लोकवस्तीपासून लांब एका सुरक्षित ठिकाणी त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

 

   हेही वाचा

 

 

Back to top button