रत्नागिरी : स्थानिक नेत्यांसमोर मोठे आव्हान; आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटासोबत | पुढारी

रत्नागिरी : स्थानिक नेत्यांसमोर मोठे आव्हान; आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटासोबत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खेडचे आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सेनेमध्ये उभी फूट पडली आहे. शिवसैनिक ठाकरे यांच्या बाजूने उभा राहिला असला तरी अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी शिंदे गटाचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेची खिंड लढवण्याची जबाबदारी रत्नागिरीत खा. विनायक राऊत, आमदार राजन साळवी व आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार अनंत गीते यांच्याकडे आली आहे.

शिवसेनेतील बंडखोरी रत्नागिरी जिल्ह्याला नवी नाही. आ. भास्कर जाधव, त्यानंतर नारायण राणे यांच्या बंडात सहभागी झालेले माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार गणपत कदम यांच्या बंडखोरीनंतरही जिल्ह्यात शिवसेना तेवढ्याच ताकदीने उभी राहिली. गेल्या काही वर्षांत आ. भास्कर जाधव यांच्यासह माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम ही मंडळीही पुन्हा शिवसेनेत आली. त्यात आठ वर्षांपूर्वी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात पक्षांतर्गत वादात नाराज असलेले खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम सहभागी झाले; परंतु त्याबद्दल येथील शिवसैनिकांना आश्चर्य वाटले नाही. मागील वर्ष-दीड वर्षात आ. योगेश कदम यांना पक्षांतर्गत वादातून डावलण्यात आले होते. तत्कालीन पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना अधिक महत्त्व त्यांच्या मतदारसंघात दिले होते. त्यामुळे रामदास कदम यांच्यासह योगेश कदमही नाराज होते. या नाराजीचा फायदा एकनाथ शिंदे यांना मिळाला.

आ. योगेश कदम यांच्या पाठोपाठ माजी मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हेही शिंदे गटात सहभागी झाल्याने रत्नागिरीतील शिवसैनिकांसह पदाधिकार्‍यांना मोठा धक्का बसला आहे. आठ वर्षांपूर्वी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांना शिवसैनिकांनी मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते. त्यानंतर आ. सामंत यांना पक्षनेतृत्वाने म्हाडाचे अध्यक्षपद, पक्षाचे उपनेतेपद आणि मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपदही दिले. पक्षाने एवढा विश्वास टाकल्यानंतरही आ. सामंत शिंदे गटात गेल्याने पदाधिकार्‍यांना मोठा धक्का बसला. रत्नागिरी मतदारसंघात सध्या पदाधिकारी शिवसेना पक्षनेत्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत; परंतु येथील आजी-माजी लोकप्रतिनिधी मात्र आ. सामंत यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत.

Back to top button